प्रिय आबा,
कसे आहात? आज तारखेने जरी तुमचा वाढदिवस असला तरी तिथीने तो दसऱ्याला असतो आणि मला तुमची त्या दिवशीही आठवण येते आणि आजही.
तुम्हाला सगळे अण्णाजी म्हणत, पण माझ्यासाठी तुम्ही आबा होतात. मी तुम्हाला आजोबा कधीच म्हटलं नाही, पहिल्यापासून आबा अशीच हाक मारली. दीपा हे नाव देखील तुम्हीच मला दिलंत, नाही का? दिवाळी च्या दरम्यान माझा जन्म झाल्यामुळे ते नाव तुम्ही मलाच बहाल केलंत. आणि मला तुम्ही त्याच नावाने हाक मारत होतात. शाळेत जरी मी मृणालिनी असले, तरी घरी आणि आजूबाजूला मी दीपा वेलणकर होते.
तुमची स्वच्छतेची आवड, वक्तशीरपणा, सदा ज्ञानार्जन करत राहणे हे गुण मी आजही विसरले नाहीये. जर्मनी मध्ये लोकं खूप वक्तशीर आहेत. आणि मीही जेव्हा वेळ पाळते तेव्हा लोकं माझे कौतुक करतात. तेव्हा मी त्यांना नेहमी तुमच्याबद्दल सांगते. तुमच्यामुळेच हा गुण माझ्यामध्ये उतरला आहे असे मला वाटतं. माझा मुलगा, म्हणजे तुमचा पणतू हा इकडेच शाळेत जातो. मस्त जर्मन बोलतो, त्याला सुद्धा वेळेचे भान असते आणि तो दिलेली वेळ नेहमीच पाळतो. त्याला तुमचा अजिबातच सहवास मिळाला नाही . पण आजी ने त्याला पाहिलं आहे, आणि त्याच्याबरोबर खेळली सुद्धा आहे. तो कधी कधी जेव्हा डोळे मोट्ठे करतो ना, तेव्हा आबा तुम्हीच आहात असा भास होतो.
इकडे आता पानगळ सुरु झाली आहे. सगळीकडे पानांचा नुसता सडा पडलेला असतो. पिवळी, केशरी, हिरवी पानं असतात चहूबाजूला. तापमान आता हळू हळू कमी होत आहे आणि लवकरच सगळी झाड निष्पर्ण होतील. मी जेव्हा इकडे बाहेर चालायला जाते तेव्हा मला बरीच वृद्ध मंडळी दिसतात. कुठला हि ऋतू असला तरी ते फिरायला जातात. तुम्ही सुद्धा रोज पाच मैल चालायला जात होतात, तेव्हा मला तुमचा खूप कौतुक वाटायचं. एखादा माणूस एवढा कसा काय शिस्तबद्ध असू शकतो हे मला तेव्हा कळत नव्हतं. रोज व्यायाम करणे, योग करणे, चालायला जाणे, न चुकता वाचन आणि लिखाण करणे, रोजचा पेपर वाचणे, दिवसातून दोनदाच जेवणे, अबर चबर कधीच न खाणे, रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणे, हे कसे काय वर्षानुवर्षे कोणाला जमू शकते, असं मला तेव्हा वाटायचं. पण आता जेव्हा हीच जीवनशैली मी आत्मसाद केली आहे, तेव्हा वाटतं, तुम्हीच मला ह्यासाठी प्रोत्साहित केलं होतं आणि नकळत मी हे सगळं तुमच्याकडूनच शिकले आहे.
तुम्हाला आठवतंय आपल्याला जेव्हा महाड ला जायचं होतं तेव्हा आपण पत्राने कळवलं होतं कि आम्ही अमुक अमुक तारखेला येणार आहोत असं? आता तर ते सगळं खूपच सोप्पं झाले आहे. आपल्याकडे जो काळा फोन होता ना घरी ज्यावर गोल अशी एक डायल होती आणि मग नंबर फिरवावा लागत होता, त्या फोनची अगदी आधुनिक आवृत्ती सध्या बाजारात आहे. तंत्रज्ञान खूपच विकसित झालं आहे. एका छोट्याश्या फोन च्या माध्यमाने घरबसल्या तुम्ही कोणालाही कॉल करून, त्या व्यक्तीशी बोलू शकता आणि तिला पाहू शकता. पत्रव्यवहार आता जवळ जवळ बंदच झाले आहेत. हल्ली ई-मेल लिहितात एकमेकांना. ते पण स्वलिखित स्वतःच्या हस्ताक्षरात नव्हे, तर कॉम्पुटर च्या मदतीने. तुम्हाला पत्र लिहायला देखील खूप आवडत असे, नाही? तुमच्याकडे त्या दोन फौंटन पेन होत्या, एक लाल शाई असलेले आणि दुसरे निळी. त्या पेन वर माझा कायम डोळा असायचा. तुम्ही मला नेहमी सांगत असत, माझ्यासारखं सुंदर हस्ताक्षर काढलंस तर देईन तुला मी ते पेन. आणि नंतर मी ते पेन मिळवलं तुमच्या कडून.
त्यावेळेस फोटो काढणे एवढे सोप्पे नव्हते. आता भरपूर फोटो काढता येतात, त्यांना छापायची ही गरज नसते, सगळं कॉम्पुटर वर डिजिटल स्वरूपात फोटोचा संचय करून ठेवता येतो. माझ्या मुलाचे आणि त्याच्या आजी आबांचे भरपूर फोटो आहेत, पण माझा आणि तुमचा किंवा आपल्या तिघांचा (तुम्ही, आजी आणि मी) असा एकही फोटो आता माझ्याकडे उरला नाही . तुमचे चेहरे आता फक्त माझ्या मनात आणि आठवणीत!
मला तुमचा सहवास अगदी कमीच लाभला, माझ्या आयुष्यातली फक्त जेमतेम १७ वर्ष. जेमतेम मी बारावीत गेले होते आणि जून महिन्यात अचानक आजारी पडून एका आठवड्याच्याआत तुम्हाला देवाज्ञा झाली आणि तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुमच्या नेहमीच्या खुर्चीत आता तुम्ही कधीच दिसणार नाही ही कल्पना मला बरीच वर्ष सतावत राहिली. माझी प्रगती बघायला तुम्ही प्रत्यक्षात नाही, पण कुठूनतरी माझ्यावर प्रेम करत असाल, मला आशीर्वाद देत असाल. तुमची दीपा आता चाळीशीच्या पुढचा टप्पा गाठताना स्वतःचा संसार, मुलं, नोकरी सांभाळताना, कितीही मोठी झाली तरी तुम्हाला आणि आजीला कधीच विसरणार नाही हे मात्र नक्की. तुमच्यामुळे आज मी इथवर पोचले आहे आणि ह्यापुढे देखील तुम्ही कायम माझ्या स्मरणात असाल.
आजी आजोबा आणि नातवंडं हे नातं सर्वात सुंदर आणि प्रेमळ असतं असं मला वाटतं, मी नात होते, आता आई आहे आणि पुढे कदाचित आजी होईन, तेव्हा तुमच्या गोष्टी नक्कीच माझ्या नातवंडांना सांगेन!
असे होते माझे आबा!
No comments:
Post a Comment