18 October 2022

Blog Marathon - October 2022 - Day 18 - माझा सांगीतिक प्रवास

मला एकंदरीतच संगीत, गाणं खूप आवडत असल्यामुळे शाळेत असताना मी गाणं शिकू लागले. आवड का कशी निर्माण झाली ठाऊक नाही. आमच्या घरी कोणीच एवढं संगीत ऐकत नाही. पण मला मात्र ते खूप आवडतं. पाचवी सहावीत असेन तेव्हा. डोंबिवली पश्चिम इथे फुले रोड वर एक संगीत शाळा होती. त्याचे नाव होतं गुरुदत्त संगीत शाळा. मी माझ्या पहिल्या गुरूंचे नाव मात्र विसरले, क्षमस्व! ते बऱ्यापैकी म्हातारे होते आणि खूप वर्ष गायन, वादन शिकवत होते. आम्ही तेव्हा लहान असल्यामुळे ते किती ग्रेट आहेत ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असू आणि आमच्याच जगात असू. एकाच वयाची चार पाच मुलं एकत्र आली कि काय गोंधळ घालतात हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल. गुरुवारी एक तास क्लास असायचा, संद्याकाळी ५ ते ६ असा. त्यात अर्धा तास आमचे सर त्यांनी किती करून आणि गाऊन ठेवले हे हेच आम्हाला सांगत, पुढे गाणं जेमतेम अर्धा तास होई आणि पुढच्या तासाला नवीन मुलं आली कि आमची घरी रवानगी. दोन एक वर्ष गेले असेन मी तिकडे. आमचे कार्यक्रम होत असत, ज्यात आम्ही मुली, मुलं गायचो, तेवढेच थोडे कौतुक होयचे. मग आला मला कंटाळा. सरांकडून स्वतःबद्दल तेच तेच ऐकून, संगीतामध्ये पुढे माझी काही प्रगती होईना. मी मग दुसरीकडे चौकशी करून ठाकूरवाडी मध्ये एका काकूंकडे क्लास लावला. शाळेतून आलं कि खाऊन लगेच क्लास ला जायचे. तिकडे खूप काही शिकायला मिळाला. तंबोरा वाजवत आलाप ताना शिकायला मज्जा आली. काकू एकदम शांत, धीर गंभीर असायच्या. जास्ती बोलत नव्हत्या. आपण बरं, आपलं शिकवणं बरं, असा त्यांचा स्वभाव होता.

मग मात्र शाळेचा अभ्यास वाढला, दहावी, बारावी, आर्टस् मध्ये ग्रॅड्युएशन करत करत संगीत शिकण्याकडे दुर्लक्ष झालं. मग माझ्या आयुष्यात आल्या माझ्या तिसऱ्या संगीत गुरु, थत्ते काकू. त्या गोपी टॉल्किएस जवळ राहत असत आणि त्या नियमितपणे संगीताचे क्लास घेत असत. त्यांच्याकडे मला जायला खूप आवडायचे. त्यांचा प्रसन्न आणि हसरा चेहरा बघून कंटाळा पळून जायचा. काकूंकडे हि नेहमी आमचे कार्यक्रम होत असत. त्या आमची छान तयारी करून घेत. अगदी खेळीमेळीचं वातावरण असे आणि गाणं शिकणं हि आपसूक होऊन जाई. लक्षणगीत, तराणा, राग, ताल, आलाप, ताना, किती सुमधुर असायचे ते जग! मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तिसरी परीक्षा दिली आणि मग मात्र नोकरी निम्मित बंगलोर ला जावं लागल्यामुळं सगळंच सुटलं.

नंतर योग आला तो २०१७ मध्ये जेव्हा मी जर्मनी ला परत आले तेव्हा. इकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे क्लास सापडणे शक्यच नव्हतं. मग मी काहीतरी गायचे म्हणून एका क्वायर मध्ये नाव नोंदवले. इकडे पाश्चात्य संगीत गातात. पट्टी, लय, ताल जरा वेगळे असतात. पण शेवटी संगीताचाच एक प्रकार. त्या सगळ्या जर्मन बायकांनी मला लगेच त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. आम्ही जर्मन आणि इंग्रजी मध्ये गात असू. मी एकदम मोकळेपणाने हलत डुलत गाताना पाहून आमची Chorleiter (शिक्षिका) खूप खुश होत असे. बाकीच्या बायका एकदम स्तब्ध उभ्या राहत असत, जे मला कधीच जमलं नाही. गाणं म्हणायला लागले कि मी आपोआप त्यावर तरंगत्ये असं मला नेहमीच वाटते. त्या गाण्याची चाल, ठेका तुम्हाला शांत राहूच देऊ शकत नाही. त्यात एकरस होयलाच होतं. तिकडे मी जवळ जवळ डीड वर्ष गेले. रात्री ८ चा क्लास असायचा, ट्रेन बस करत जावं लागायचं पण मी गेले. कारण त्या वेळेस ती एकाच गोष्ट होती जी मला निर्मळ आनंद देत होती. 

घर बदल्यामुले तिकडे जाणे हि बंद झाले. २०२० ते २०२२ हि दोन वर्ष कोरोना ने गिळंकृत केल्यामुळे मला पुढे काहीच करता आलं नाही. सप्टेंबर २०२२ पासून परत मी संगीत शिकणं सुरु केले. लास्य प्रिया फाईन आर्टस् ह्या संस्थे अंतर्गत मी आता दाक्षिणात्य संगीत आणि भजन शिकते आहे. आपल्याकडे इतकी सुंदर भजनं आहेत जी मी आतापर्यंत कधीच गायली नाहीयेत. तो एक तास परत मंत्रमुग्ध होऊन मी अगदी पहिल्यापासून शिकते आहे! तसेच मला इकडे घराजवळच एक क्वायर हि सापडलं आहे. तिकडे सगळ्या आज्या आणि आजोबा गातात. आमची चोरलेतर (शिक्षिका) इटालियन आहे आणि ती खूपच सुंदररित्या आम्हाला सगळं समजावून सांगते. मला त्यांची लय काही कळत नाही, पण शब्द आणि चाल कळत असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर गाते. आम्ही खूप हसतो, वेगवेगळ्या लकबी शिकत, वेगवेगळे आवाज करत सराव सुरु करतो आणि मग एक डीड तास कसा जातो, ते कळत नाही. इकडेही आम्ही इंग्रजी आणि जागतिक भाषांमध्ये गातो. मी त्यांना एकदा हिंदी गाणं म्हणायला शिकवणार आहे!

एकीकडे मी नारायणम भजे नारायणम हे सुंदर भजन गाते आणि दुसरीकडे मी एल्टन जॉन चे आय एम स्टील स्टँडिंग हे पॉप गाणं सुद्धा गाते. तो वेळ म्हणजे माझा वेळ असतो. माझं जग, माझं संगीत आणि मी. ज्ञानार्जन जिथे करायला मिळेल, तिथे मी करत असते. माझी संगीत साधना अशीच पुढे चालू राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय भाषा म्हणजे संगीत, बरोबर ना?




1 comment:

The divine intervention

The sole intention to start the spiritual group, Adhyatmwari in Germany was to give people a platform to practice their spiritual beliefs an...