22 August 2023

गीतामयी

मे महिन्यात पुण्याला आम्ही माझ्या मुलाच्या मुंजीसाठी गेलो होतो. अगदी दोन आठवड्याच्या धावपळीमध्ये सगळं व्यवस्थित पार पडलं. त्या समारंभाला माझी नणंद आली होती. तिने मला अतिशय सुंदर अशी भेटवस्तू दिली, ती म्हणजे भगवद गीतेची इंग्रजी मधील आवृत्ती. का कोणास ठाऊक, त्यामुळे मी अगदी खुश झाले. जर्मनी ला परत जाऊन वाचन करू असं ठरवलं आणि इतर सामानाबरोबर ते पुस्तक अगदी नीट घेऊन आले घरी परत.

माझ्या सासूबाईंनी गीता धर्म मंडळामधून १८ अध्याय शिकले आहेत, त्याच्या रीतसर परीक्षा दिल्या आहेत, विवेचन ऐकलं आहे, श्लोकांमधला स्वतःला कळलेला अर्थ लिहून काढला आहे आणि त्या ह्या विषयामध्ये पारंगत आहेत. हे सगळं मला माहित होतं, ह्यावर आम्ही बरेचदा बोललो होतो. पण गीता शिकण्याचा योग्य अजूनतरी आला नव्हता. गीतेचे पुस्तक घरी काय आलं, रस्ता हि समोर कोणीतरी दाखवून दिला. आमचा एक ऑनलाईन ग्रुप आहे अध्यात्मावरी नावाचा, जिथे आम्ही दर बुधवारी भेटून राम रक्षा पाठ करतो, संकष्टीला अथर्वशीर्ष म्हणतो. त्या ग्रुप मध्ये एक महिला रुजू झाली होती, तिचे नाव, गाव मला ठाऊक नाही. तिने एके दिवशी ग्रुप मध्ये गीता परिवाराबद्दल आणि ते चालवत असलेल्या मोफत गीता वर्गांबद्दल माहिती पोस्ट केली. ग्रुप वर भरपूर मेसेज, फॉर्वर्डस येत असतात, पण हा नेमका मी पहिला, गीता परिवाराच्या वेबसाईट वर गेले आणि अचंबित झाले. किती मोट्ठ्या प्रमाणावर हे कार्य अविरत चालू आहे ते मला कळलं. बऱ्याच भारतीय भाषांमध्ये सकाळी ५ वाजल्यापासून पहाटे २ वाजे पर्यंत हे वर्ग ऑनलाईन चालू असतात. ४० मिनिटांचे एक सेशन असते आणि आठवड्यातले पाच दिवस हे वर्ग झूम वर चालवले जातात. त्यात वेगवेगळ्या लेव्हल असतात. सुरवातीला १२ आणि १५ अध्याय शिकवला जातो. त्याला सुमारे चार आठवडे लागतात. प्रत्येक श्लोक अगदी शुद्ध उच्चारात कसा म्हणावा ते इथे शिकवतात. रोज २ ते तीन श्लोक शिकवून, शेवटी सराव करून घेतला जातो, क्लास संपला कि श्लोकांचे ऑडिओ ग्रुप वर टाकले जातात. ते ऐकून घरी सराव करायचा असतो. मी लगेच माझं नाव नोंदवलं. २४ जुलै रोजी मराठी भाषेतले L1 लेव्हल सुरु झाली, तशीच इतर भाषांमध्ये हि सुरु झाली. माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलाला १२ अध्याय दोन वर्षांपूर्वी शिकवला होता, तेव्हा मी हि त्याच्याबरोबर नकळतपणे शिकले होते. त्यामुळे १२ अध्याय अगदी सहजपणे मला म्हणता येऊ लागला. १२ अध्याय शिकवून झाल्यावर त्याचा व्हिडिओ करून टाकायचा होता. पाठ न करता, वाचून म्हणायचा होता. तो व्हिडिओ करून पाठवला आणि अगदी जोमाने १५ अध्यायाची सुरवात झाली. १२ च्या मानाने १५ जरा कठीण वाटला सुरुवातीला, पण जसजसं एक एक श्लोक कसा म्हणावा ते कळत गेलं, तसतसं हा अध्याय देखील आवडू लागला आणि जमू लागला. गंमत म्हणजे ती महिला, जिने गीता परिवाराबद्दल मेसेज टाकला होता ती काही दिवसांनी ग्रुप सोडून निघून गेली. मला गीता परिवाराबद्दल कळावं आणि मी गीता शिकायला सुरवात करावी ह्यापुरती ती ग्रुप मध्ये होती असंच मला वाटतं.

गीता फक्त म्हणता न येता, ती कळली पाहिजे, ह्यासाठी दर आठवड्याला शनिवारी हिंदी मध्ये आणि रविवारी इंग्रजी मध्ये विवेचन सत्र आयोजित केली जातात. १० श्लोकांचे विवेचन येणाऱ्या शनिवारी, रविवारी आणि पुढच्या १० श्लोकांचे विवेचन पुढच्या आठवड्यात असं अगदी व्यवस्थितरित्या सुरु असते. सध्या L1 लेव्हल जशी चालू आहे, तशीच L2 , L3 , L4  साठीचे वर्ग देखील सुरु आहेत. त्यांच्यासाठी हि नियमित विवेचनाचे वर्ग असतात, संस्कृत व्याकरणाचे वर्ग असतात, अधून मधून माहितीपर वर्ग चालूच असतात. हा एवढा पसारा कितीतरी सेवक मिळून अगदी न चुकता, न कंटाळता आणि काहीही मोबदला न घेता करत असतात. त्या सगळ्यांना माझे वंदन आणि खूप खूप कौतुक. 

जर्मनी मध्ये बरोबर साडे पाच वाजता (भारतात तेव्हा ९ वाजलेले असतात) वर्ग सुरु होतो आणि चाळीस मिनीटांनी संपतो. गेलं चार आठवडे कसे गेले, कळलेच नाही. एका ग्रुप मागे एक टीम काम करत असते. ग्रुप ची तांत्रिक बाजू सांभाळणारे घिनमीने दादा, ग्रुप coordinator  कुलकर्णी दादा, आणि आमचे शिक्षक डॉ पाटील दादा ह्यांनी अगदी पहिल्या वर्गातल्या मुलांना जसं शिकवतात तसं आम्हाला शिकवलं, न कंटाळा करता, चुका दुरुस्त केल्या, शाब्बासकी दिली आणि प्रोत्साहन दिलं. त्या तिघांचे हि खूप खूप आभार. १५ व्या अध्यायाचा व्हिडिओ करून पाठवल्यानंतर गीता गुंजन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एक छानसे e -certificate सगळ्या साधकांना मिळते. मलाही प्रशस्तीपत्र मिळाल्यावर एखाद्या लहान मुलासारखा आनंद झाला. आता १२ आणि १५ अध्याय कंठस्थ करायचा प्रयत्न करायला हवा. जमेल मला हि खात्री आहे. आणि काही दिवसांची विश्रांती घेऊन पुढची लेव्हल सुरु होते. 

L1 च्या WhatsApp ग्रुप वर सुमारे १०० जण रुजू झाले होते. त्यातले १२ वा अध्याय शिकायला चालू केला तेव्हा  २०-२२ जण होते आणि १५ वा सुरु केला तेव्हा १० ते १२ जण उरले. ह्यातले पुढे किती येतील कोणास ठाऊक, पण अगदी उत्साहात आपण एखादी गोष्ट करायला घेतो आणि मग ती जमतेच असं नाही. पण गीतेच्या बाबतीत सगळ्यांनीच प्रयत्न करावेत आणि एक ध्यास म्हणूनच ह्याकडे पहावे असं मला वाटतं.

अजून काय काय शिकायला मिळणार आहे ह्याची मला उत्सुकता आहेच, पण माझं आयुष्य आता गीतामयी झालं आहे हे मात्र नक्की. सतत डोक्यात श्लोक घोळत असतात, मुखी श्लोक येत असतात. कंठस्थ कसे करावे ह्याचा विचार मनात घोळत असतो आणि गीता कशी जगावी ह्याचा विचार सतत सुरु असतो.

गीतेने मला शोधले कि मी तिला, ते मला माहित नाही, पण गीता पठण सुरु केल्यामुळे एक वेगळाच अनामिक आनंद मिळाला आहे, ते मात्र नक्की. 

सगळ्यांनी ह्याचा अनुभव एकदातरी नक्की घ्या, अशी आपल्याला विनंती. मी गीता शिकते आहे हे कळल्यावर माझ्या काही मित्रमैत्रिणिनीं पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या L1 लेव्हल मध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांचा अनुभव मला ऐकायला नक्कीच आवडेल.

तुम्हाला हि जॉईन करायचे असल्यास इकडे भेट द्या.

https://www.learngeeta.com/

The dilemma

My mother-in-law left for Pune today after spending two and a half months with us in Germany. And suddenly the house seems empty without her...