18 September 2020

मी आणि माझा मित्रपक्ष - मांजर

आज सकाळी सकाळी आईचा व्हाट्सअँप वर मेसेज, वेळ झाला की कॉल कर, एक गम्मत सांगायची आहे. 

आज काय झालं - मी मनातल्या मनात 

पटकन कामं आवरली आणि तिला फोन केला.

आई: अगं तुला ती मनी माऊ आठवत्ये ना, रोज आपल्या बाल्कनी मध्ये येणारी? 

मी: हं

आई: ती अगं बाळंतीण झाली होती, पण तिची पिल्लं कुठे ठेवली होतीं इतके दिवस हे काही कळत नव्हतं. परवा बाबा आणि मी बाल्कनी मध्ये उभे होतो रस्त्यावरची गम्मत बघत तर खाली बघतो तर काय, एक पिल्लू निपचित पडलं होतं, आपल्या बाल्कनी च्या खाली, त्या दुकानाच्या वरच्या पॅसेज मध्ये. काही हालचाल करत नव्हतं. आम्हाला वाटलं मेल बिचारं. पाऊस खूप पडत होता. नंतर त्याला वर काढू असा विचार करून आम्ही घरात गेलो. २४ तास उलटून गेले, तरी पाऊस थांबायचा काही पत्ता नाही. ते पिलू तसंच तिकडे होते आणि काय चमत्कार, ते हालत होते अगं. बाबा तर एकदम ओरडले, ते हलतंय, ते हलतंय. त्यांच्या ऑफिस मध्ये एक बाई कामाला आहे झाड पूस करणारी ती सांगायची मांजरीचे पिल्लू मला द्या ती व्यायली की. त्यांनी तडक तिला फोन केला, ती धावतच आली, तिच्या नातीला ही घेऊन आली. भर पावसात बाबा खाली उतरले आणि त्यांनी त्या पिल्लाला उचलले, त्या बाईंनी मग बाबाना वर चढायला मदत केली. मी डब्बा शोधून घेऊन येई पर्यंत ह्यांनी पिल्लाला वर काढलं ही. मी ओरडलेच बाबांना. पडले बिडले असते म्हणजे, एवढ्या पावसात, केवढ्याला पडलं असतं ते. असो. महत्वाचं म्हणजे ते पिल्लू जिवंत होतं. त्या पिल्लाला पुसलं, त्याला कापड घालून डब्यात बसवलं, त्याला बोळ्याने दूध पाजलं आणि ते पिल्लू ती बाई घेऊन गेली घरी. आता ते मस्त आहे. वाढतं आहे, तिची नातं त्या पिल्लाची मस्त काळजी घेत आहे! बघ ज्याच्या पाठी देव असतो, त्याला कोणी काहीही करू शकत नाही. २४ तास पावसात भिजत होते ते. आजूबाजूला कावळे, कबूतंर होती, पण ते टिकून राहिलं, त्याचे स्वाश चालू होते, त्याची दोरी बळकट होती!

मी: काय सांगतेस काय? खूपच मस्त बातमी आहे की ते पिल्लू आता बरं आहे! आणि बाकीच्या पिल्लांचं काही कळलं का?

आई: हो, अगं तिसऱ्या मजल्यावर श्रेया च्या घरासमोर आहे सगळी फॅमिली. ३ पिल्लं आणि स्वतः आई. तिसऱ्या मजल्यावर सगळ्यांकडे जाते, दूध पिते, म्हणून आपल्याकडे आता कमी येते. एकदा सकाळी हजेरी लावून जाते. बाबांशी मस्ती करून, त्यांच्या पायात घुटमळून. त्यांनी कुरवाळले, दूध दिले की ही पसार. वर तिसऱ्या मजल्यावर सगळे छान काळजी घेत आहेत तिची. 

मी: चला बरं झालं. तुमची काळजी मिटली. तुम्हाला ही तुमची नातवंडं बघता येतील वरचेवर.

आई हसली.

आई: हो गं, आम्हांला ही थोडा विरंगुळा. वेळ कसा जायचा नाहीतर आमचा? तेवढंच जरा तोंडीलावणं.

मी: हो, खरंय!

मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारून, एकमेकींना बाय करून, फोन ठेवला. 

तसं मांजर हा विषय आमचा खूप जिव्हाळ्याचा. शाळेत असताना आमच्याकडे नेहमीच मांजर असायचे. आमचे घर पहिल्या मजल्यावर असल्याने आणि मोट्ठी टेरेस असल्याने मांजरी सहज तिकडे येऊ शकायच्या आणि आम्ही ही कधी त्यांना हाकलून दिलं नाही. माझे आजी आजोबा नेहमीच मला प्रोत्साहन देत आणि मांजरीचं करायला मदत करत. आमच्याकडे जवळ जवळ १५ वर्ष मांजरीच्या तीन पिढ्या वाढल्या. मग प्रत्येक मांजरीची डझन भर बाळंतपणं, त्या पिलांचे बोक्यांपासून संरक्षण करणं, पिल्लं थोडी मोट्ठी झाली कि त्यांना कोणाला तरी देणं किंवा मग दूर सोडून येणं हे काम माझे आणि माझ्या बाबांचे असायचे. वेलणकर कॅट मॅटर्निटी होम असं नाव ठेवायला पाहिजे असं मी बाबाना नेहमी गमतीने म्हणायचे. 

माझी आजी तासंतास मांजरीशी गप्पा मारत बसायची. बाहेर जिन्यावरून जाणारे लोक अचंबित होयचे. घरात कोणी नसताना आजी कोणाशी बोलत आहेत असा नेहमीच त्यांना प्रश्न पडायचा. मांजर सुद्धा डोळे मिटून शांतपणे आजीचं सगळं ऐकत बसायची. पायात घुटमळत राहणे हा त्यांचा मनपसंद छंद. कधी कधी तर आजीच्या नऊवारी पाताळामध्ये अडकून आजी पडता पडता वाचायची, मग खायची आजीच्या शिव्या. पण तरीही दुसऱ्या मिंटाला परत तेच. मांजर आम्हांला सगळ्यांना अजिबात घाबरायची नाही. पण माझी आई ऑफिस मधून येणार हे कळलं, म्हणजे जवळ पास ६ वाजले कि ही बरोबर सोफ्यावरून खाली उतरून तिच्या नेमून दिलेल्या जागेवर येऊन बसायची. आईचा दराराच असा होता कि मांजर ही घाबरून असायचे.

आमच्याकडे असलेली मांजर कधीच चोरून दूध प्यायची नाही. मांजर ह्या नावाला ती कधीच जागली नाही. तिच्या ताटली मध्ये दूध दिलं तरच ती प्यायची, कधी चुकून दूध उतू गेलं आणि हिला ओट्यावर आम्ही नेऊन तोंड दुधापाशी नेलं तरीही ही अजिबात प्यायची नाही. ते उतू गेलेलं दूध मग आजी तिच्या ताटलीमध्ये ओतायची तेव्हा मॅडम पिणार. दुधाचा पातेलं साफ करायची वेळ ठरलेली असायची, रात्री ८ ला आई राहिलेली साय काढून, थोडा खरवडून मांजरीला दूध द्यायची. ८ वाजले रे वाजले कि ही कुठूनतरी धावत यायची आणि सगळं गट्टम करून टाकायची. तिच्या डोक्यात वेळ अगदी फिट्ट बसली होती. तिन्ही पिढ्या अगदी ना चुकता वेळेत येऊन दूध प्यायच्या.

माझ्या शाळेतल्या मैत्रिणी नेहमी यायच्या पिलांशी खेळायला किंवा मनीमाऊ चे खेळ पाहायला. तासंतास स्वतःला स्वचछ करत चाटत बसायची. उन्हं खात, मस्त रेलून द्यायची. कधी स्वतःच्या शेपटीशी गोल गोल फिरत खेळत बसायची. तिच्याकडे कधी छोटा रबरी बॉल टाकला कि मस्त दोन्ही पुढच्या पायांनी इकडून तिकडे सरकावायची. एकदा चुकून लोकरीचा गोळा आला तिच्या ताब्यात, मग काय विचारता, मस्त स्वतःला त्याच्यात गुंडाळून घेऊन अडकली कि. तिला सोडवायला किती तरी वेळ लागला. माझे आजोबा गेले त्या नंतर ३ दिवस तिने काहीही खाल्लं नाही. सारखी ते असलेल्या खोलीत जायची, त्यांना हाक मारल्यासारखं म्याव म्याव करत त्यांना शोधत होती. 

एकदा ती समोरच्या तिसऱ्या मजल्यावरच्या एका घरच्या खिडकीच्या छपरावर अडकली. तिथे कशी काय गेली कोणास ठाऊक. ते घर बंद होतं, अनेक वर्ष. तिथे कोणीच रहात नव्हतं. काढणार तरी कसं तिला. बरं इकडून बोलून काही तिला कळणार नव्हतं. फायर ब्रिगेड ला बोलवायचा विचार झाला. शेवटी मग आमच्याकडे पाण्याचा पंप चालू करणारा एक नेपाळी माणूस शिडी घेऊन तिथपर्यंत चढला आणि त्याने तिला खेचून खाली काढले. बापरे! इतका जीव खाली वर सगळ्यांचा! काही विचारू नका. इतकी लोक जमा झाली होती आजूबाजूला, रस्त्यावर! वेलणकरांची मांजर चांगलीच फेमस झाली होती. नंतर एकदा कधीतरी ती जवळ जवळ १ आठवडा गायब होती. आम्ही तिला खूप शोधलं, आजू बाजूला सांगून ठेवलं. सगळे ओळखत होतेच आमच्या कबरीला. मस्त काळी पांढरी मऊ केस आणि हिरवे डोळे असलेले आमची कबरी! ती काही केल्या सापडेना. मी तर खूप निराश झाले. लक्ष लागत नव्हतं कशातच. एकदा खेळत असताना शेजारच्या बिल्डिंग मध्ये कुठून तरी तिचा आवाज आला. मी तिला हाक मारली. तर बिचारी ती धावत पळत, गळ्यात दोरी बांधलेली, माझ्यावर उडीच मारली तिने. मी तिला पटकन कुशीत घेतले. ती शांत झाली. धाप लागली होती तिला. कितीतरी दिवस उपाशी होती कि काय कोणास ठाऊक, रोड झाली होती. मी तिला घरी नेलं, घरी सगळे तिला बघून खुश. तिला दूध दिलं आणि मग ती झोपली. मग बरेच दिवस ती बाहेर जायला घाबरायची. मग नंतर जाऊ लागली. ती असताना कधीही उंदीर, झुरळ किंवा इतर काहीही घराकडे फिरकले नाही. 

ती आमच्या घरातला एक घटक होती, आमच्या कुटुंबाचा एक भाग. मग काही वर्षांनी बिल्डिंग च्या दुरुस्तीचं काम निघालं. तेव्हा कोणीतरी तिला परत उचलून नेलं आणि मग ती काही परत आली नाही. तेव्हा पासून मी ठरवलं परत मांजर पाळायची नाही. नंतर मी ही अभ्यासात बिझी झाले आणि मांजर हा विषय माझ्यासाठी संपला.

मला मांजरीची भीती वाटत नाही, किंवा काहींना वाटतो तसं तिरस्कार ही वाटत नाही. मी मांजरींना खूप जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबाद्ल नेहमीच आपुलकी वाटते. बंगलोर ला ही यायची एक बाल्कनी मध्ये. तिला ही दूध द्यायचो मी आणि तनय. नंतर मग आम्ही जर्मनी ला आलो, इकडे काही शक्य नाही मांजर पाळणं. बरेच सोपस्कार  आहेत इकडे, इन्शुरन्स वैगैरे करावा लागतो.

डोंबिवली ला परत आता एक मांजर येऊ लागलं आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. आई बाबा अगदी मनापासून तिचं करतात. तिच्यावर लक्ष ठेऊन असतात. तिची काळजी करतात, वेळेत नाही आली तर! जुन्या त्या सगळल्या आठवणी परत डोळ्यासमोरून गेल्या. त्यांच्या मुळे मला भावंडं नाहीत ह्याचा मला कधीच वाईट वाटलं नाही. त्यांची मोट्ठी बहीण म्हणूनच मी त्यांची काळजी घेतली आणि त्यांना लळा लावला. त्या सगळ्या मांजरींना माझा धन्यवाद. तुमच्यामुळे ही भूतदया शिकले आणि माझा बालपण समृद्ध झालं!    

 


The dilemma

My mother-in-law left for Pune today after spending two and a half months with us in Germany. And suddenly the house seems empty without her...