महाराष्ट्र मंडळ कार्लसरूहे मध्ये वर्षात तीन सण साजरे होतात.
जानेवारी मध्ये हळदी कुंकू असते ज्यात बायका आणि मुले उत्साहाने भाग घेतात. खेळ, गप्पा गोष्टी, उखाणे, खाऊ, चहा असा मस्त बेत असतो.
मार्च एप्रिल च्या दरम्यान गुढी पाडवा कार्यक्रम असतो. त्यात दार वर्षी जवळ जवळ १०० ते १५० मंडळी कार्लसरूहे मधून आणि आजू बाजूच्या गावांमधून येतात. दर वर्षी आम्ही एक थिम ठरवतो आणि मग सगळा कार्यक्रम ह्या थिम च्या अवती भवती फिरतो. त्या कार्यक्रमात लहान, मोट्ठे सगळेच भाग घेतात. मुलांना एक व्यासपीठ मिळते, ज्यावर ते आपले विविध गुण आणि कला सादर करू शकतात. एप्रिल २०२२ मध्ये मी मुलांकडून गणेश स्तोत्र करून घेतले होते. मुलांनी खूप मेहनत घेऊन अतिशय सुंदररित्या ते स्तोत्र म्हटले होते. इकडे तुम्ही मुलांनी म्हटलेले स्तोत्र पाहू शकता.
आणि ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये दिवाळी कार्यक्रम असतो. त्यात फराळाचा एक बॉक्स आणि दोन तास छान रंगतदार कार्यक्रम असतो. जेवायला दोन तीन फूड स्टॉल्स असतात आणि गप्पा, गोष्टी, मस्त चहा आणि फराळ अशी संध्याकाळ रंगते.
ह्या वर्षी हा कार्यक्रम ०५.११.२०२२ रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ८ पर्यंत करायचे ठरवले आहे. ह्या कार्यक्रमाच्या तयारीला आम्ही जून पासून लागतो आहोत, वेगवेगळ्या टीम्स बनवल्या गेल्या आहेत, सांस्कृतिक टीम, communication टीम, फूड व्हेंडर टीम, technical टीम इत्यादी. सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे कि नेहमी प्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आणि निर्मळ आनंद प्रदान करायचा.
ह्या वर्षी दिवाळी कार्यक्रमाची थिम आहे इंद्रधनू - विविधतेत एकता. भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे विविध नाच, गाणी, कला इकडे ह्या कार्यक्रमात सादर करायचा विचार आहे. मंडळी सगळी आपलीच, पण गाणी इतर राज्यांची. मला एक सुचलेले म्हणजे मुलांकडून कार्यक्रमाच्या सुरवातीलाच मनाचे श्लोक म्हणून घ्यायचे. आणि दिवाळी निम्मित श्री रामाचें वंदन आणि स्मरण नाही केले, तर कसे चालायचे? म्हणून मग माझ्या सासूबाईंना ही कल्पना ऐकून दाखवल्या बरोबर त्यांनी मनाचे श्लोक मधील रामाचे श्लोक मला लगेच शोधून दिले. आमच्या WhatsApp ग्रुप वर ही कल्पना मांडल्यावर पहिल्यांदा काहीच प्रतिसाद आला नाही कोणाचाच. मग मी मागच्या वेळेस ज्या मुलांनी भाग घेतला होता त्यांच्या पालकांना मेसेज करून विचारणा केली. मग पटापट मुलांची जमवाजमव झाली आणि सराव जोरात सुरु झाला.
यंदा ८ मुली आणि २ मुलं मनाचे श्लोक म्हणणार आहेत. घरी पालक रोज त्यांच्याकडून श्लोक म्हणून घेतात आणि ह्या श्लोकांचे संस्कार मुलांवर आणि घरावर हि नक्कीच होत असणार. आपल्या मायभूमी पासून दूर असून, इकडेच ज्यांचा जन्म झाला आणि आता पुढे शिक्षण होईल, ती छोटी छोटी मुलं मनाचे श्लोक एवढ्या आवडीने म्हणतात ह्याचे मला खूप कौतुक आहे. त्यांच्या पालकांचे हि तेवढेच कौतुक कि ते मुलांना प्रोत्साहन देऊन, समजावून श्लोक म्हणायला लावतात. आपली संस्कृती, भाषा जपण्याचा प्रत्येकाने असाच प्रयत्न करावा!
आमचा कार्यक्रम पार पडला कि सविस्तर लिहीनच. आणि मुलांचा विडिओ हि ब्लॉग पोस्ट वर टाकेन.
No comments:
Post a Comment