25 February 2023

Blog Marathon - February 2023 - Day 25 - परवचा

मी लहान असताना माझे आजी आजोबा आमच्या घरी डोंबिवलीलाच होते. माझी आई नोकरी करत होती आणि बाबांचे औषधांचे दुकान होते, त्यामुळे मला आजी आजोबांनीच वाढवलं हे म्हणायला काहीच हरकत नाही. माझ्या आजोबांना मी आबा म्हणायचे. ते अतिशय हुशार होते आणि स्वकष्टाने खूप मोट्ठ्या हुद्यावरून निवृत्त झाले होते. त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. सकाळी लवकर उठून, अंघोळ करून, देवाची पूजा करत. आजी सगळी तयारी करून ठेवत असे. पूजा करून झाली कि मग सगळी पाठ असलेली स्तोत्र, श्लोक एका पाठोपाठ एक म्हणत असत. मग ५ मैल फिरून येत असत आणि दोनदाच जेवत असत. इतर वेळ वाचन, लिखाण ह्यात वेळ घालवत असत. ते माझा अभ्यास घेत असत आणि मला बरीच पुस्तकं वाचून दाखवत असत. संध्याकाळी आबा शुभंकरोती  आणि पाढे म्हणत असत, त्यात नेहमीचे एक ते तीस पाढे असत आणि दिडकी, एकी असं हि काहीतरी म्हणत. त्यांचे गणित पक्के होते. आमच्याकडे गणपती दीड दिवस असत, आबा सगळं स्वतः करत. आरत्या मला कश्या पाठ झाल्या, मला आठवत नाही. आजी आजोबांचं ऐकून ऐकून कधी आत्मसात  झाल्या, कळलंच नाही.

रामरक्षा मला माझ्या आईच्या आईने शिकवली. ती गिरगाव मध्ये रहात होती. तिच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन महिने मी जात असे. तेव्हा रोज संध्याकाळी रामरक्षा आणि मारुती स्तोत्र ह्याचा परवचा आपसूक होत असे. शेजारी एक जोशी नावाचे गुजराती कुटुंब होते. त्यांच्या दोन्ही मुली माझ्याबरोबर रामरक्षा आणि मारुती स्तोत्र शिकल्या. किती सहज जमले तेव्हा आम्हाला, एकमेकींसोबत! तेव्हा रोज संध्याकाळ ठरलेलीच असायची, दोन्ही स्तोत्र म्हटल्याशिवाय जेवायला मिळत नसे. सवयच झाली मग आणि दोन्ही स्तोत्र एकदम तोंडपाठ झाली. 

स्तोत्र म्हणून काय होते, हा प्रश्न तेव्हा पडायचा नाही. आजी आजोबा सांगत आहेत, स्वतः म्हणत आहेत, म्हणजे हे चांगलेच आहे हा दृढ विश्वास होता. शालेय जीवन पार पडल्यानंतर शिंग फुटल्यावर हे सगळं स्तोत्र वैगैरे म्हणून काहीही भलं होत नाही असा गैरसमज होऊ लागला आणि करताकरविता आपणच असतो आणि आपल्या हातात सगळं काही असतं असा फोल विचार मनात रुजू लागला. बरीच वर्ष मध्ये मी काहीही स्तोत्रपठण करत नव्हते, स्वतःच्याच धुंदीत होते. एक जबरदस्त फटका बसल्यानंतर हे कळलं कि लहान असताना त्या स्तोत्रांचे कवच होते आपल्याभोवती आणि ती स्तोत्र रोज म्हटल्यामुळे एक अनामिक शक्ती होती आपल्यामध्ये, एक विश्वास होता सगळं काही निभावून नेण्याच्या. परत सगळं सुरु केलं, जप, रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि गणपती स्तोत्र परत म्हणून लागले आणि हळूहळू माझ्या खचलेल्या मनाला छान उभारी मिळाली आणि एक वेगळीच शांतता आणि ताकत मिळाली .

महाराष्ट मंडळ कार्लसहृ मध्ये लहान मुलांना विविध कार्यक्रमांसाठी गणपती स्तोत्र, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र तयार करून घ्यायची मला संधी  मिळाली आणि मुलांनी आणि पालकांनी चांगली साथ दिली. जर्मनी मध्ये राहून मराठी आणि संस्कृतशी खूप कमी संबंध येत असल्याने हा उपक्रम मला कायम चालू ठेवावा असे वाटते. कळत नकळत त्यांच्यावर संस्कार होत राहतील आणि पुढच्या आयुष्यासाठी नक्कीच एक चांगली आठवण आणि एक ठेवा होईल. स्तोत्रांचा काय परिणाम होतो ह्याचे मोजमाप करायला कुठलंही यंत्र ह्या जगात नाही, पण नवनवीन प्रयोग करून जपाचा, मंत्रांचा, श्लोकांचा मेंदू वर किती चांगला परिणाम होतो हे मोजण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी एका तरी यंत्राचा शोध लागलाच पाहिजे. आणि तेव्हाच साऱ्या जगाला आणि भारतीयांना पटेल कि आपली संस्कृती किती थोर आहे आणि आपले पूर्वज आपल्यासाठी किती मोठ्ठा खजिना ठेऊन गेले आहेत ह्या सगळ्या साहित्याच्या रूपात ते आपल्याला कळेल.

तो दिवस नक्कीच येईल अशी मी अशा करते!



1 comment:

  1. Wah khupch chan lihale aahes ani agadi khar aahe he, shlok ani mantra madhe hi takat ani urja aahe tich sarv goshti madhun aaplyala nibhaun nete ani ubhari pan dete. Aaple puwaj aaplya sathi khajina theun gele aahet te kharach aahe. Khup khup thank you tula ithe Germany madhe tuzyamule aamchya mulana he shlok shiknyacha yog aala 😊🙏

    ReplyDelete

Lost and found

Today, it was especially warm compared to other days in the otherwise dull and gray month of November. The sun was shining and was hinting a...