आज सुमेधा
खूप खूश होती. दिवाळी जेमतेम एका महिन्यावर येऊन ठेपली होती आणि तिला आजच ४० कापडी
पर्सेस शिवायची ऑर्डर मिळाली होती. तिचा व्यवसाय हळूहळू लोकांपर्यंत पोचत होता.
तिला प्रसिद्धी मिळत होती, तिच्या कामाचे कौतुक होत होते आणि तिला त्यातून खूप
आनंद मिळत होता.
सुमेधा एका मध्यम वर्गीय घरातील लाडकी लेक. मोठा भाऊ, आई, वडील, नोकरदार असे छानसे छोटेसे कुटुंब. शिक्षण पूर्ण करुन बँकेच्या परीक्षा देऊन बँकेत नोकरी लागून तिने घरच्यांना चांगलाच आनंद दिला. पुढे एका चांगल्या घरात लग्न करुन ती आपल्या सासरी गेली. बँकेतील नोकरी, घर सांभाळून तिने टेलरिंगचा एक छोटासा कोर्स केला. त्यात तिला खूप रुची वाटली. लहान मुलांचे कपडे शिवतांना तिला एक वेगळाच आनंद मिळत होता. पण बँकेतील फिरती असलेली नोकरी, त्याच्या अडनिड्या वेळा आणि हा छंद हे सगळे सांभाळताना तिची तारांबळ उडू लागली. शेवटी तिने एक धाडसी निर्णय घेतला. बँकेत असलेली शाश्वत नोकरी सोडून तिने हा छंद पुढे जोपासून तो व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतला. बँकेत असलेली नोकरी सोडण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया नोंदवल्या पण तिच्या घरच्यांनी मात्र तिला पुरेपूर साथ दिली. तिला योग्य ती मदत आणि प्रोत्साहनही दिले.
तिने घरच्या घरी व्यवसाय सुरु केला. लहान मुलांचे कपडे, दुपटी इ. ती ऑर्डरप्रमाणे शिवून देऊ लागली. हळूहळू तिचा जम बसला आणि काम सुरु झाले. अधून मधून असेही दिवस यायचे की काहीच काम हातात नसायचे. मग तेव्हा ती वेगवेगळी पुस्तके, वेबसाईट्स बघून तिकडून कल्पना घेऊ लागली. अजून कसा हा व्यवसाय वाढवता येईल ह्याचा विचार करु लागली.
त्याच दरम्यान तिच्या भावजयीने तिच्याकडे एक विचारणा केली.
“मला कापडी पर्सेस शिवून देशील का सुमेधाॽ”
“मी कधी आधी शिवल्या नाहीत, पण प्रयत्न नक्कीच करेन. तुला कधीपर्यंत हव्या आहेतॽ”
“मला एका महिन्यात चालतील, त्या मला माझ्या परदेशी मैत्रिणींना द्यावयाच्या आहेत.”
“ठीक आहे, मी देते तुला. माझ्याकडे काही ब्लाऊजपीस आहेत, ते तू बघ आणि सांग त्यातले तुला कोणते पसंत आहेत. त्याच्या छान पर्सेस होतील. ते नाही आवडले तर मी जाऊन बाजारातून दुसरे घेऊन येईन.”
“ठीक आहे. थँक्स सुमेधा.”
सुमेधाच्या डोक्यात चक्र सुरु झाले. तिच्या मावशीने तिला ब्लाऊजपीस दिले होते, कपडे शिवायला. ते अजून वापरले नव्हते तिने. तिने त्याचे फोटो काढून आपल्या भावजयीला पाठविले आणि तिने काही ब्लाउज पीसेसना होकार कळवला. सुमेधा लागली कामाला. तिच्या ओळखीतल्या एका महिलेकडून तिने डिझाइन केलेल्या पर्सेस शिवून आणून त्या तिने भावजयीला पोचत्या केल्या. भावजय खूश, भावजयीच्या परदेशी मैत्रिणीही खूश.
ह्या घटनेला दोन वर्ष होतील. परत भावजयीने तीच विचारणा केली आणि सुमेधाने तत्परतेने तिला परत वेगळ्या आणि अधिक सुंदर पर्सेस शिवून पाठवल्या. मग तिच्या डोक्यात विचार आला. जश्या हिला पर्सेस शिवून दिल्या, तशाच आपल्या ओळखीतल्या बायकांना ह्याबद्दल सांगायला काय हरकत आहेॽ पर्सेस तर कायमच बायकांना हव्या असतात. सणासुदीला, भेट म्हणून द्यायला इ. आणि काय आश्चर्यॽ तिला दिवाळीसाठी एक नाही दोन नाही तर चांगल्या ४० पर्सेसच्या ऑर्डरी मिळाल्या. तिच्या ओळखीतल्या त्या महिलेने ही तिला मदत करायचे ठरवले आणि दोघीजणींनी मिळून ती ऑर्ड पूर्ण करण्याचा ध्यासच घेतला.
सुमेधाने तिच्या भावजयीला एक मेसेज पाठविला.
“मला तुझे आभार मानायचे आहेत.”
“कशाबद्दलॽ”
“तू विचारलस की पर्सेस शिवून देशील का, तेव्हा मी पहिल्यांदाच पर्स शिवून दिल्या. तुझ्यामुळे पर्स शिवल्या मी. आधी कधीच प्रयत्न केला नव्हता. तू २,३ वेळेस मला ऑर्डर दिलीस आणि त्यातूनच मला इतरांनाही विचारायची कल्पना सुचली.”
“अग त्यात माझे कायॽ तुझी मेहनत, तुझी कल्पना, तुझी सचोटी.”
“नाही, तरीही. तुझ्यामुळे एक नविन दिशा मिळाली.”
“कीप इट अप आणि तुला ऑल द बेस्ट.”
सुरुवात कशी का होईना, कोणाच्यामुळे का होईना, ते कार्य पुढे नेणे, चालू ठेवणे, त्याला वृद्धिंगत करणे हे एका मेहनती व्यक्तीलाच जमू शकते.
सुमेधाला एक नविन उभारी मिळाली होती. एक नवीन प्रोत्साहन मिळाले होते. ती आता कुठेही कमी पडणार नव्हती. ती जिद्दीने दिवाळीसाठी ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कामाला लागली. खात्री आहे की या ऑर्डरबरोरबच ती आता आणखीही जास्त शिवून ठेवेल की ज्यायोगे ग्राहकाला नाही असा शब्द ऐकावा लागणार नाही.
तुम्ही तिच्याशी इथे संपर्क साधू शकता:
फेसबुक वर:
इटुकले पिटुकले कलेक्शन:
Awesome read in Marathi 👌😍😘😘
ReplyDelete