लहानपणी आषाढी एकादशीला उपास करायचा, मस्त साबुदाण्याची खिचडी खायची, फलाहार करायचा, इकडे तिकडे थोडी गाणी ऐकायची आणि दिवस संपून जायचा.
पण काल मात्र आयुष्यात पहिल्यांदा आषाढी एकादशी काय असते आणि कशी असते ते कळले. जर्मनी मध्ये गेले चार महिने आम्ही दर बुधवारी राम रक्षा स्तोत्र म्हणायला ऑनलाईन भेटतो. गेल्या महिन्यापासून संकष्टीला अथर्वशीर्ष म्हणायला भेटतो आहोत. त्याच ग्रुप मध्ये विचार सुरु झाला, आषाढी एकादशी येत्ये, काय करता येईल, कार्यक्रम करूया का? हा प्रश्न ग्रुप मध्ये मांडताच आपोआप रूपरेषा घडत गेली. कोणी भजन म्हणू असे म्हणाले, कोणी अनुभव सांगू असे म्हणाले, बघता बघता एक सुंदर असा कार्यक्रम तयार झाला.
काल रात्री जर्मन वेळेनुसार रात्री आठ ते रात्री दहा पर्यंत जवळजवळ ६० मंडळी सहभागी झाली होती. भारतातूनही काहीजण सहभागी झाले होते. त्यांचे विशेष कौतुक!
माझ्या मैत्रिणीच्या मुलीने, स्वराने गीतेचा पंधरावा अध्याय म्हणून कार्यक्रमाची सुंदर सुरवात केली. इतके स्पष्ट उच्चर होते तिचे आणि इतकी निरागसता, आम्हाला तिचे खूप कौतुक वाटलं.
मग जान्हवी दांडेकर, ज्या स्वीडन ला राहतात, त्यांनी "मला समजलेली माउली" ह्या मध्ये त्यांनी केलेल्या वाचनातून त्यांना ज्ञानेश्वर कसे उलगडले हे अगदी सोप्प्या भाषेत आणि सुमधुर वाणी मध्ये आमच्यासमोर मांडले.
अनघा महाजन ह्यांनी तर त्यांच्या बालपणीचे पंढरपूर असं काही चित्रित केले, कि आम्ही जे तिथे कधीच गेलो नाहीये, ते हि जाऊन मस्त फिरून आलो. अनघा चा सुंदर आवाज आणि वाचायची खुमासदार शैली सगळ्यांनाच भावली.
राजेश्री कदम ह्यांच्या आई नुकत्याच वारी करून आल्या होत्या, त्या हि दोन मिनटे बोलल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून आम्हाला सगळ्यांनाच स्फुरण चढलं.
त्यानंतर श्वेता देवधर ह्यांनी एक सुंदर भजन सादर केलं.
तेजा याळगी ह्यांनी गीताच्या पंधराव्या अध्यायाचे महत्व सांगून पुढे तो आम्हाला अगदी सुंदररित्या म्हणून दाखवला. खूप प्रसन्न आणि छान वाटलं.
श्रुती कुलकर्णी, माझी मैत्रीण जिने मला आजचा हा कार्यक्रम आखण्यात मदत केली तिने तिच्या सासरी शिदोरी द्यायला जायचा अनुभव सांगितला. त्यानंतर तिच्या मैत्रिणिचे एक रेकॉर्डिंग प्रस्तुत केलं, ज्यात त्या मैत्रिणिने तिचे वारीतले अनुभव सांगितले आणि आता कशी तिने त्यांच्या सोसायटी मधेच वारी सुरु केली आहे ह्याचे सुंदर वर्णन केले.
त्यानंतर हर्षा पुराणिक ह्यांनी पांडुरंगाची दृष्ट काढताना जे गाणं म्हणतात ते सादर केलं, अगदी शांत स्वरात म्हटले आणि खूप भावपूर्ण वाटलं. त्यांच्या बालपणीच्या आठवणी जागृत होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आलेच, त्याच बरोबर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात देखील पाणी आल्यावाचून राहिले नाही. त्यांच्या आजोबाना घशाचा कॅन्सर झाला होता आणि आजोबांनी नामस्मरणाचे पाणी रोज पिऊन तो कॅन्सर बरा केला. त्यांच्यावर टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये संशोधन झाले आणि अजूनही हि हे कसे घडले ह्याचा तपास सुरूच आहे.
पुढे मनीषा बापट ज्या खूप छान गातात आणि शास्त्रीय संगीत शिकल्या आहेत आणि शिकवत आहेत ह्यांनी एक सुंदर पद म्हणून दाखवलं.
मला काही महिन्यांपूर्वी "पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती" ह्या अभंगाचा अर्थ फॉरवर्ड म्हणून मिळाला होता. कानडा ओ विठ्ठलु, कर्नाटकू ह्याचा अर्थ नक्की काय आहे हे कळल्यावर सगळेच खूष झाले. इतकी वर्ष जो गैरसमज होता तो दूर झाला.
त्यानंतर प्राची कारेकर ह्यांनी एक सुंदर भजन सादर केलं. खूप शांत वाटलं आणि एक अनामिक आनंद मिळाला.
विशाल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी विठूचा गजर केला. खूप छान वाटलं.
शेवटी पसायदान म्हणायचे होते पण त्या आधी कोणाला काही म्हणायचे आहे का, सांगायचे आहे का हे विचारताच, निषाद फाटक जे एक गुणी कलाकार आहेत, संगीतकार आहेत, त्यांनी "माझे माहेर पांढरी" हे अजरामर भजन सादर करून कार्यक्रमाला अधिकच रंगून टाकलं.
शेवटी वैष्णवी वागळे हिने पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
दोन तास भुर्रकन उडून गेले. प्रत्येकाच्या मनात तृप्तता होती, एक शांतता होती. भारताबाहेर राहून जर्मनी मध्ये एकत्र ऑनलाईन का होईना सगळ्यांनी मिळून ह्या आषाढी एकादशीचा आस्वाद घेतला होता. आता परत कधी भेटणार, पुढचा कार्यक्रम कुठला करूया ह्या दिशेने विचार सुरु झाले. मला तर किती वेळ झोपच लागली नाही कार्यक्रम संपल्यानंतर.
माझे आणि श्रुतीचे सगळे आभार मानत होते खरे, पण खरं तर करता करविता तर वर बसला आहे, आम्ही दोघी फक्त त्याची आज्ञा पाळतो आहोत. इतरांना जो आनंद मिळाला ह्या कार्यक्रमामुळे त्यात आम्ही भरून पावलो असेच म्हणेन.
दोन तासाचा कार्यक्रम ज्यांना बघायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे झूम रेकॉर्डिंग सोबत जोडले आहे. नक्की बघा आणि आस्वाद घ्या.
No comments:
Post a Comment