26 March 2023

राम रक्षा पाठ

आपल्या सर्वांना हिंदू शोभन नाम संवत्सराच्या हार्दिक शुभेच्छा.

२२ मार्च रोजी महाराष्ट्रात गुढी पाडवा हा सण खूपच उत्साहात साजरा केला जातो. आता इतकी मराठी माणसं देशाबाहेर आहेत कि ती देखील आपआपल्यापरीने हा सण घरी आणि एकत्र साजरा करतात. 

गुढी पाडव्यापासून राम नवमी पर्यंत खूप लोक राम रक्षेचा पाठ करतात. हे मला माहित होतं, माझी आई आणि माझ्या सासूबाई दरवर्षी हे करतात. मी बरीच वर्ष असा एखादा समूह शोधत होते ज्यात नियमित राम भक्ती करता यावी. पण भारताच्या आणि जर्मनीच्या वेळांमध्ये फरक असल्यामुळे ते काही जमत नव्हते. काय करावे ह्या विचारात असतानाच सासूबाईंनी एक कल्पना सुचवली. आणि मी लगेच कामाला लागले.

महाराष्ट्र मंडळ Karlsruhe ह्या WhatsApp ग्रुप वर मी एक विचार मांडला आणि माझ्या इतर मित्र परिवाराला ह्यात सामील करून घ्यायचे निश्चित केले. भराभर माणसं जोडली गेली. मित्रपरिवारामध्ये विचार पसरला आणि २२.०३.२०२३ ह्या शुभ मुहूर्तावर एक नवीन संकल्प सुरु झाला.

२२.०३.२०२३ ते ३०.०३.२०२३ पर्यंत रोज रात्री आठ वाजता (जर्मन वेळेनुसार) आम्ही Zoom ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर भेटून, राम रक्षा म्हणणार आहोत. चार दिवस झाले आहेत, आज पाचवा दिवस आहे. रात्री ते साधारण .४० पर्यंत प्रत्येकी पाच आवर्तने म्हणून होतात आणि त्यानंतर कोणाला काही बोलायचे असल्यास उरलेला वेळ आम्ही त्यात घालवतो. रोज पाचजण राम रक्षा म्हणायची इच्छा दर्शवतात आणि ३० जण असल्यास, ३० गुणिले म्हणजे १५० आवर्तने आमची अर्ध्या पाऊण तासात एकत्रित म्हणून होतात. एकत्र म्हणताना एक वेगळाच उत्साह आणि वेगळीच ऊर्जा जाणवते.

रामरक्षेची महती आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेलच. ते स्तोत्र म्हणजे एक कवच आहे, जे आपलं वाईट शक्ती, प्रवृत्ती आणि विचारांपासून सौरक्षण करते आणि आपल्याला एक चांगलं आयुष्य जगायला मदत करते. लहानपणापासून आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे स्तोत्र आपल्या आजी आजोबांकडून शिकले असेल. तेव्हा अगदी नेमाने म्हटले ही असेल, पण जसे आपण मोठे होत गेलो, तसे हे म्हणून काय होते असा विचार बऱ्याच जणांच्या मनात आला असेल आणि त्यानंतर ते स्तोत्र म्हणणे बंद झाले असेल. वेळ मिळत नाही किंवा खूप काम असते, ह्या सबबी आपणच आपल्याला दिल्या असतील. मग आयुष्यात असे काही घडते कि आपण परत रामाकडे किंवा आपल्या इष्ट देवतेकडे वळतोच आणि नव्याने त्या सगळ्या स्तोत्रांचा, मंत्रांचा अर्थ उलगडतो. 

मी जेव्हा हा उपक्रम सुरु केला, तेव्हा सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. पण मी तर म्हणते ही संधी मला रामानेच दिली आहे आणि इतकी वर्ष मी का दवडली ह्याची मला खंत आहे. परंतु ती इंग्रजी मध्ये म्हण आहे ना "Better late than never" तसाच काहीसा विचार करून अगदी जोमाने आणि आनंदाने मी हा संकल्प सुरु ठेवणार आहे. राम नवमी नंतर दर आठवड्याला बुधवारी रात्री ८ वाजता मी रामरक्षा पठण एकत्र समूहामध्ये सुरु ठेवणार आहे. ज्यांना सहभागी व्हायला आवडेल, त्यांनी माझ्याशी नक्की संपर्क साधा.

राम रक्षेचा हा वारसा पुढे नेऊया,

विश्वशांती साठी प्रार्थना करूया आणि माणसातलं माणूसपण जपूया.

!!!श्री राम जय राम जय राम!!!






No comments:

Post a Comment

The dilemma

My mother-in-law left for Pune today after spending two and a half months with us in Germany. And suddenly the house seems empty without her...