काय मंडळी?
तोंडाला पाणी सुटलं की नाही, ब्लॉगपोस्ट चे शीर्षक वाचून? हे असं एक त्रिकुट आहे जे कधीच फेल होत नाही. नाही का? मी अजून एक दोन गोष्टी मुद्दामहून तिकडे लिहिल्या नाहीत. सांडगी मिरची, मिरगुंडं, चिकवड्या आणि पापड्या. ह्यातल्या अर्ध्या गोष्टी तर माहिती नाहीत बऱ्याच जणांना. आज संध्याकाळी जेवणाची तयारी करताना अचानक हे सगळे पदार्थ मनात आले आणि सध्या माझ्याकडे कुरडई, पापड, मिरची, मिरगुंडं हे सगळंच असल्यामुळे ते सगळं मस्त तळता तळता मी परत भूतकाळात गेले.
डोंबिवली ला आमचं पहिल्या मजल्यावर घर आहे. त्याला दोन्ही बाजूला दोन मोट्ठ्या गॅलऱ्या आहेत. त्यात आम्ही लहानपणी भातुकली, पकडापकडी, घर घर असं बरच काही खेळायचो. झाडांच्या कुंड्या हि बऱ्याच होत्या तिकडे. आई ला खूप हौस होती. त्यातला एका गॅलरी मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात हमखास माझी आजी आणि मी काही ना काहीतरी वाळत घालत असायचो. साबुदाण्याच्या चिकवड्या, तांदुळाच्या पापड्या, पोह्याचे पापड, एक ना दोन. उन्ह तापली की आम्ही आत आणि आमची मांजर राखण करायला बाहेर मस्त पहुडलेली असायची. कोणाची बिशाद तिकडे एखादी चिमणी किंवा कबुतर फिरकेल ह्याची! आजी सगळं अगदी आनंदाने करायची, जरा जास्तीच करायची, मग शेजारी पाजारी वाटता देखील यायचं. सगळे पदार्थ नीट वाळल्यावर ते नीट स्वछ आणि कोरड्या पत्र्यांच्या डब्यांमध्ये भरून ठेवायचं आणि आजीकडे लगेच खिचडी ची फर्माईश करायची. आजी काय सदैव तयार स्वैपाक घरात जादू करून काही ना काहीतरी मस्त खाऊ करायला. खिचडी मध्ये भरपूर कोथिंबीर, खोबरं हे असायचंच. काय चव लागायची त्या खिचडी ची, साधे तांदूळ आणि मूग डाळ ती पण जी काही चव असायची त्याला आह हा हा. खिचडी च्या सोबत नुकतेच केलेले पापड, कुरडई, मिरची हे ओघाने आलेच. कधी कधी तरी ते सगळं खायला मिळावं म्हणूनच मी आजी ला खिचडी करायला सांगत असे. पुढे पुढे मग आजी ला होईनास झालं आणि मग आम्ही पापड, कुरडई, चिकवड्या आजी च्या भावाच्या सुनेकडून, पेठे मंडळी करून महाड हुन मागवू लागलो! माझ्या बाबांची मामेभावंडं आणि त्यांच्या बायका, म्हणजे माझ्या काका काकू खानावळ चालवत असे आणि खूप सुंदर करायच्या त्या सगळे पदार्थ आणि स्वैपाक पण मस्त असायचा त्यांचा. घरची चव वेगळी कळायची.
माझी मामी खान्देशी आहे. ती लग्न होऊन आली तेव्हा मी नववी मध्ये होते. ती एक प्रकार करायची खिचडी चा मस्त झणझणीत आणि तेल, दाणे घालून. तिच्याकडे गेले की एकदा तरी करायला सांगायचेच मी तिला तिची स्पेशल खिचडी. तेव्हा ही तळण असायचंच. त्याशिवाय खिचडी घश्याखाली उतरायचीच नाही. मग हळू हळू ते सगळे पदार्थ बाद झाले, अचानक तळकट खाऊ नये, वजन वाढते अश्या जाहिराती येऊ लागल्या आणि बिचारी खिचडी एकटीच खाल्ली जाऊ लागली. मज्जा येत नव्हती, पण काय करणार, भीती मुळे सगळे चित्रच बदलून गेले होते. वडे, भजी, ही सगळे पदार्थ लुप्तच होऊन गेले महाराष्ट्रीयन स्वैपाक घरातून आणि त्याची जागा घेतली कॉर्नफ्लॅक्स, ब्रेड अश्या पाश्चिमात्य पदार्थानी.
पण त्याने काय वाट लागली आहे आपल्या प्रकृतीची हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. भारतीय आहार हा पौष्टिक आहे, त्यात समतोल असतो सगळ्या घटकांचा हे आता आपल्यालाच पाशात्य देश सांगत आहेत आणि ते आपण मान्य करतोय, काय विरोदाभास आहे पहा!
तर मंडळी, पुढच्या वेळेस खिचडी केलीत तर त्यासोबत पापड, कुरडई आणि मिरच्या तळायला विसरू नका! बाहेर मस्त पाऊस, डिसेंबर ची थंडी आणि घरी तुपावर केलेली गरम गरम खमंग अशी खिचडी! त्यात हव्या त्या भाज्या घाला, मस्त ओलं खोबरं आणि भरपूर कोथिंबीर वरून पाहिजे तर थोडं लिंबू!!! मी खिचडीत गोडा मसाला सुद्धा घालते.
खिचडी, पापड आणि कुरडई!
तुमच्या काही आठवणी आहेत का?
नक्की सांगा मला!
No comments:
Post a Comment