12 September 2022

सखू आजीच्या सांज्याच्या पोळ्या

सखू आजी...

मी तिला लहानपणापासून ह्याच नावाने ओळखत होते आणि हाक ही तशीच मारत होते. सखू आजी म्हणजे माझ्या बाबांची सख्खी धाकटी मावशी. ती महाड ला राहायची, म्हणजे माझ्या आठवणीत तरी ती तिथेच होती. आधी ती दादर ला होती असं आजी सांगायची मग नंतर महाड ला गेली. तिकडे तिचे दोन भाऊ, त्यांचा परिवार आणि ही आणि हीचे यजमान असे वेगवेगळ्या घरात पण एकाच आवारात राहायचे. सोबत होयची एकमेकांची आणि मदत ही. सगळे सण एकत्र साजरे होत होते आणि अडी अडचणीला एकमेकांसाठी हजर असायचे.

सखू आजी आणि तिचे यजमान, बाळासाहेब आमच्याकडे डोंबिवली ला नेहमी येत असत. मला ती आली की खूप आनंद होत असे, ती एकदम हसरी, मनमिळाऊ होती. तिचे स्वतःचे काही अपत्य नव्हते. तिचा माझ्या बाबांवर खूप जीव होता. ते जेव्हा मिलिटरी शाळेत होते तेव्हा ती त्यांना नेहमी भेटायला जायची, कारण तेव्हा माझे आजी आजोबा पंजाब मध्ये होते. सुट्ट्या सुरू झाल्या की ती बाबांना ट्रेन ने पंजाब ला घेऊन जायची आणि तिकडे थोडे दिवस राहून परत यायची. त्यामुळे बाबांचा तिच्यावर विशेष जीव होता. त्यांना ही मावशी आली की खूप आनंद होत असे, मग काय आइस्क्रीम चा विशेष कार्यक्रम होत असे ती आली की, धम्माल मस्ती, गप्पा गोष्टी. वेळ कसा जायचा हे कळायचे नाही आणि ती परत जायची वेळ यायची. मी तिला नेहमीच अजून थोडे दिवस रहा, असे सांगत असे. आणि म्हणत असे आलीस की लगेच जातेस, अजून का नाही रहात. मग ती मायेने मला जवळ घेऊन, माझ्या चेहऱ्यावर हात फिरवून म्हणायची, येईन हो दिपा परत, तूच का नाही येत महाड ला सुट्टी लागली की?

मग मी शाळेच्या सुट्ट्यांची वाट बघत असे. तिच्याकडे जायचा दिवस उजाडला की मला खूपच आनंद होत असे, बस ने तो प्रवास, अगदीच खराब स्थिती मध्ये असलेल्या बसायच्या जागा, तो बस ला एक विशिष्ठ वास, हे सगळे तेव्हा काहीच वाटायचे नाही. गावाला जातोय हाच आनंद असायचा. आजी आणि आबांच्याबरोबर महाड ला पोचलो की काय आदरातिथ्य होत असे आमचे. माझे आजोबा जावई ना तिथले, मग काय एकदम अण्णाजीं (माझ्या आजोबांचे टोपणनाव) साठी काय करू आणि काय नको असे होत असे सगळ्यांना. आजीचे दोन्ही भाऊ, त्यांच्या बायका, त्याची मुलं, सगळे आमच्या मागे नुसते, काय हवं, नको ते बघायला. मला तर एकदम एखाद्या राजकन्ये सारखं वाटत असे. माझे सगळे काका, काकू, आत्या माझे खूप लाड करत असत. मला सिनेमा ला घेऊन जा, कधी बागेत आइस्क्रीम खायला, कधी नदीवर, कधी भेळ खायला, कधी मंदिरात आरती ला, माझी नुसती चंगळ असे.

महाड च्या वास्तव्याचे highlight म्हणजे सखू आजीने केलेल्या सांज्याची पोळया. अहा हा हा, ती चव मी कधीच विसरू शकत नाही. इतकी मऊ, लुसलुशीत आणि खमंग. तिच करू जाणे! एकदा तरी पोळ्यांचा बेत होत असे. आणि मी मनसोक्त त्यावर तूप घालून तीन चार तरी फस्त करत असे. वर्षानुवर्ष तिच चव, तिच माया आणि तोच ओलावा. सखू आजी कडे दिवस कसे जायचे कळायचे नाहीत. मातीचे घर, मातीच्या चुली, तो बंब ज्यात पाणी गरम होत असे अंघोळीसाठी, तो मातीचा वास, आजूबाजूला असलेल्या फुलांच्या बागा, विहिरीवर कपडे धुवायला जाणे, गाई म्हशींचा गोठा, तो शेणाचा वास, शेणाने सारवलेल्या भिंती, पडवी, ताजे ताजे दूध, लोणी, एक ना दोन. महाड म्हटले की हे सगळं ओघाने आलेच!

सखू आजी चे यजमान वारल्यावर ती मग एकटीच यायची आमच्याकडे. तेव्हा भरपूर दिवस राहायची, खूप गोष्टी सांगायची मला त्यांच्या लहानपणीच्या. त्यांना कसं दूरवरून पाणी आणावं लागत होतं, कशी घरातली सगळी कामं करावी लागत होती, भावंडांच्या कुरबुरी, भांडणे, पण एकमेकांसाठी खंबीर पणे उभं राहणे हे सगळं ऐकून मला खूपच छान वाटत असे. मला कोणी भावंडं नाहीत, माझ्या बाबां ना ही नाहीत, पण नाती काय असतात आणि नातेवाईक काय असतात ते माझ्या आजीच्या माहेरच्या मंडळीकडे बघून मला कळलं.

एके दिवशी महाड हून निरोप आला की सखू आजीला stroke झाला आहे आणि ती आता चालू फिरू शकत नाही. मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा मी माझ्या आजी बरोबर गेले होते महाड ला तिला भेटायला, ती काहीतरी बोलत होती आम्हाला दोघींना बघून, पण तिच्या बोलण्यावर ही परिणाम झाला होता. ती काय बोलत होती, कोणालाच काही कळत नव्हते. तिचे लांब सडक केस कापून टाकले होते, तिची अशी अवस्था मला बघवत नव्हती. सखू आजीच्या भाच्यांनी आणि त्यांच्या बायकांनी तिची सुश्रुषा केली, तिची खूप काळजी घेतली. पण ती त्या आजारातून काही बरी झाली नाही आणि एके दिवशी ती आम्हाला सगळ्यांना सोडून देवाघरी निघून गेली.

ती गेल्या नंतर मला काही महाड ला जावसं वाटलं नाही. मग माझे कॉलेज, पुढे उच्च शिक्षण, बंगलोर ला नोकरी साठी जाणे, लग्न इत्यादी मध्ये तिकडे गेलोच नाही. आई बाबांकडून कळायचं तिथला हाल हवाल. लग्नानंतर २००६ मध्ये डिसेंबर महिन्यात गेलो होतो, सगळेच, माझे सासू सासरे, आई बाबा आणि माझी आजी. सखू आजी रहात होती ते घर बंदच होते. तिकडे गेले तेव्हा उगाच वाटलं, आजी आता दाराची कढी काढून बाहेर येईल आणि म्हणेल आलीस का दिपा, प्रवास कसा झाला? चहा टाकू का थोडा? की जेवायला वाढू? तुझ्या आवडीच्या सांज्याच्या पोळ्या केल्या आहेत!!!

No comments:

Post a Comment

The dilemma

My mother-in-law left for Pune today after spending two and a half months with us in Germany. And suddenly the house seems empty without her...