माझ्या आईची आजी मालदोली ह्या गावी रहायची. चिपळूण जवळ हे छोटेसे गाव. जास्ती वस्ती नव्हती. तिकडे वीज ८० साली आली, जेव्हा मी शाळेत होते. त्या आधी सगळे तसेच वावरायचे वीजे शिवाय. पणजी एकटीच असायची पणजोबा गेल्यानंतर. तिच्या हाताशी भरपूर माणसं होती कामाला. आमराई मध्ये काम करायला, फणस काढायला, गाई म्हशी चरायला न्यायला इत्यादी. मे महिना म्हटलं कि आंब्यांचा पाऊस असायचा तिच्याकडं. वरची माडी आंब्याने भरलेली, माजघर, स्वैपाकघर काही विचारू नका, आंबेच आंबे. पाहिजे तेवढे, पाहिजे तेव्हा. माझी आई आणि माझी अंजु मावशी ह्या माझ्या पंजीकडे, म्हणजेच त्यांच्या आजोळी होत्या काही वर्ष राहायला. त्यामुळे त्यांना त्यांच्या आजीचा खूप लळा होता आणि आंब्यांवर विशेष प्रेम. आमरस म्हणू नका, पन्ह म्हणू नका, नुसत्या फोडी करून, किंवा चोखून. मज्जाच मज्जा. आणि आंब्याचे प्रकार ही इतके, आता तर ते बघायला ही मिळत नाहीत.
माझी आई सांगायची मला, पणजीकडे एक बाई यायची कामाला. तिला म्हणायची, "बायो, कुस्को नासको आंबो दे". तर तिला पणजी म्हणायची, "मेले, कुस्को नासको कशाला, चांगला आंबा घे कि, आहेत केवढेतरी". तेव्हा नोकर माणूस जरा घाबरून असायचा आणि आदबीनेच वागायचा मालकाशी. पंड्या नावाचे एक गृहस्थ मला आठवत आहेत. त्यांना ही बऱ्याच वेळा पणजी ने आंबे काढून आणायला सांगितले आहेत, ताजे झाडावरून.आईचे आंबा प्रेम कुठून आले ह्याची थोडक्यात माहिती दिली तुम्हाला. ती आज ही तितक्याच आनंदाने आणि तन्मयते आंबे खाते. वेगवेगळे प्रकारचे आंबे आणून ती जणू तिच बालपणच जगते बहुदा. आता पैसे देऊन आंबे आणावे लागतात. तेव्हा एक आंबा जरा आंबट निघाला कि तो टाकून दुसरा खायचा असा नियम होता गावी. मला आठवतंय, मी शाळेत असताना, पणजी कोणाबरोबर तरी आंब्याची पेटी पाठवायची मे महिन्यात. काय फळ होतं, काय चव होती, अहा हा.
तेच आंबा प्रेम माझ्या मुलाकडे आले आहे. तो इतका आतुरतेने वाट बघत असतो मे महिन्याची, कि काही विचारू नका. बंगलोर ला असताना, मे महिना म्हणजे चैन. माझे बाबा आंब्याची पेटी, पेटी कसली, पेट्या घेऊन यायचे आणि कौतुकाने नातवाला वेगवेगळे आंबे खाऊ घालायचे. तो ही शर्ट काढून, नुसता बनियान वर बसून भरपूर आंबे खायचा, मस्त तोंड माखवायचा आणि आनंदी असायचा. माझ्या बाबांची तर तयारी सुद्धा होती, इकडे आंब्याची पेटी पाठवायची, पण ते शक्य नव्हते. तिकडून इकडे विमानसेवा चालू नाही आणि असती तरी, आंबे पाठवणे शक्यच नव्हते. माझ्या सासूबाईंनी मागच्या वर्षी आमरस काढून त्याची आंबा पोळी करून ठेवली होती. ती ही ह्यावर्षी हुकली. त्यांनीच संपवली, काय करणार.
ह्या वर्षी जर्मनी मध्ये "देसी जर्मन्स" ह्या एका भारतीय समूहाने आम्हाला हापूस आणि केसर हे दोन प्रकारचे आंबे उपलब्ध करून दिले. श्री हर्षल देशपांडे हे स्वतः फ्रांकफुर्ट ला जाऊन आम्हा कार्लसहृ आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी आंबे घेऊन आले. त्यांचे किती ही आभार मानले तर थोडेच आहेत. ते आंबे एका आठवड्यातच फस्त झाले. आमरस, पुरी हा बेत करून झाला. कापून, चोखून खाऊन झाले. एवढ्याश्या आंब्यांवर कसं काय भागवायचे. मग गूगल च्या मदतीने अजून कुठे काही मिळतंय का ते शोधलं. ऑनलाईन इंडियन स्टोअर्स मध्ये होते उपलब्ध, पण त्यासाठी अजून ही सामान मागवावे लागणार होते. नुसते आंबे नव्हते येणार. मग अजून एक पत्ता सापडला. https://www.frische-mangos.de/. इकडे तर खजिनाच सापडला मला. केसर, हापूस, बैगनपल्ली, इमामपसंद, पायरी असे सगळे आंबे उपलब्ध होते. मला काय करू, काय नाही असं झाले. म्हटलं होऊ दे खर्च. मे महिनाभरच काय तो आपला भारतीय आंबा असतो. इकडे मिळणारे कसले ते आंबे. जर्मन लोक त्याला आंबा मानून खात असावेत. पण मी कधीही इकडे साऊथ अमेरिकेचे आंबे विकत आणले नाहीयेत. ते माझ्यासाठी आंबेच नाहीत मुळी! आंब्याचा राजा म्हणजे हापूस. ती काय ती पर्वणी. बाकी सगळे आपले असतात बाजूला, पण हापूस पुढे सगळंच फिके हो!
हापूस, केसर, बैगनपल्ली आणि इमामपसंद ह्या सगळ्यांचा आस्वाद मुलाला घेता ह्यवा म्हणून ऑनलाईन आंबे मागवले. डिलिव्हरी एकदम चोख आणि पटकन झाली. फळ ही चांगले होते. खर्च झाला खरा खूप, पण त्या मानाने जो आनंद मिळालं, जे समाधान मिळालं ते नाही शब्दात व्यक्त करता येणार.
तनय ला येता जाता आंबा दिला तरी त्याला हवा असतो. काल बाबाची सगळी कामं निमूटपणे करून दिली त्याने. का तर बाबाने आंबे परत मागवावे म्हणून! आंब्यासाठी कायपण. हे आंबा प्रेम त्याला त्याच्या आजीकडून मिळालं आहे. ते असेच वृद्धिंगत होवो, अशीच आंबे खाण्याची संधी मिळत राहो. ह्या वर्षी भारतात जाता आले नाही, आंबे खाऊन गावाची, माझ्या पंजीची आणि त्या भरभरून देणाऱ्या आमराईची आठवण काढत तरी दिवस छान जातील.
No comments:
Post a Comment