पापड, कुरडई आणि खिचडी
काय मंडळी? तोंडाला पाणी सुटलं की नाही, ब्लॉगपोस्ट चे शीर्षक वाचून? हे असं एक त्रिकुट आहे जे कधीच फेल होत नाही. नाही का? मी अजून एक दोन गोष्टी मुद्दामहून तिकडे लिहिल्या नाहीत. सांडगी मिरची, मिरगुंडं, चिकवड्या आणि पापड्या. ह्यातल्या अर्ध्या गोष्टी तर माहिती नाहीत बऱ्याच जणांना. आज संध्याकाळी जेवणाची तयारी करताना अचानक हे सगळे पदार्थ मनात आले आणि सध्या माझ्याकडे कुरडई, पापड, मिरची, मिरगुंडं हे सगळंच असल्यामुळे ते सगळं मस्त तळता तळता मी परत भूतकाळात गेले. डोंबिवली ला आमचं पहिल्या मजल्यावर घर आहे. त्याला दोन्ही बाजूला दोन मोट्ठ्या गॅलऱ्या आहेत. त्यात आम्ही लहानपणी भातुकली, पकडापकडी, घर घर असं बरच काही खेळायचो. झाडांच्या कुंड्या हि बऱ्याच होत्या तिकडे. आई ला खूप हौस होती. त्यातला एका गॅलरी मध्ये एप्रिल आणि मे महिन्यात हमखास माझी आजी आणि मी काही ना काहीतरी वाळत घालत असायचो. साबुदाण्याच्या चिकवड्या, तांदुळाच्या पापड्या, पोह्याचे पापड, एक ना दोन. उन्ह तापली की आम्ही आत आणि आमची मांजर राखण करायला बाहेर मस्त पहुडलेली असायची. कोणाची बिशाद तिकडे एखादी चिमणी किंवा कबुतर फिरकेल ...