शिस्तप्रिय पण प्रेमळ शिक्षक
माझी शाळा विलेपार्ल्याची "पार्ले टिळक विद्यालय". माझी शाळा त्याकाळी नावाजलेली - प्रसिद्ध होती व अजूनही आहेच. मी इंग्रजी १ ली ते इ. ७ वी (म्हणजेच आताची ५ वी ते ११ - त्याकाळी म्याट्रिक ११ वी असे) म्हणजे म्याट्रिकपर्यंत त्याच शाळेत होते. त्याकाळी शाळेत पाच सहाशे मुले असायची एकूण. एका वर्गात फार तर ३० मुले. आणी प्रत्येक वर्गाच्या दोनच तुकड्या. शाळा चालू होती त्यातच १९४२ ची 'चले जाव' चळवळ सुरु झाली. सर्व पुढारी तुरुंगात गेले. आम्ही सर्व लहानच होतो ११-१२ वर्षांची. पुष्कळदा शाळा भरायची पण सोडून द्यायचे. वातावरण गंभीरच होते. त्यातच दुस-या महायुद्धाची - लढाईची पळापळ. मुंबईवर बॉम्ब पडणार म्हणून सर्व मुंबई खाली झाली. पुरुषवर्गाने आपली कुटुंबे गावांना पाठवून दिली. मुंबई खाली झाली, पार्ले ओस पडले. आम्हीपण कोकणात मामाकडे वर्षभर राहिलो. मग हळू हळू सर्वजण मुंबईत परतू लागले. आम्हीपण पार्ल्याला येऊन आम्ही चार भावंडे शाळेत रुजू झालो. तेव्हा पार्ल्यात "जागा भाडयाने देणे आहे" अशा पाटया झळकू लागल्या. मालक पण आपल्याला जागेमधे भाडेकरू मिळावेत म्हणून २-४ रुपये भाडे कमी करू वगैरे ...