आबा

हॅलो आबा,

कसे आहेत? कुठे आहेत?

ओळखलंत ना मला? मी तुमची दीपा. आता एका मुलाची आई, बायको, सून आणि बरंच काही. आधी फक्त तुमची नात होते, आता प्रोमोशन झाला आहे माझं.

आज तुम्हाला जाऊन तब्बल २३ वर्ष झाली. पण एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी मला तुमची आठवण येत नाही. आज मी जे काही आहे, जशी आहे ती तुमच्या शिकवणी मुळेच आणि आज तुम्ही हवे होतात दीपा चं कौतुक करायला. तुमच्या डोळ्यात वेगळीच चमक असती आज.


तुम्ही कदाचित एका दुसऱ्या घरी जन्म ही घेतला असेल नाही का? कि आकाशात एखादा तारा म्हणून अढळ स्थान मिळवलं आहेत? कि तुमच्या पंतूच्या रूपात परत आला आहेत आपल्या दीपा कडे?

तनय ला पाहून आई नेहमी म्हणते कि हे आबाच परत आले आहेत. तुमच्यासारखेच मोट्ठे पाणीदार आणि माहिती मिळवण्यासाठी आतुर असेलेले डोळे. तुमच्यासारखीच दात ना चुकता घासायची शिस्त, अभ्यास करून टाकून मगच दुसरं काम करायला जाणं. त्याला गणित खूप आवडतं अगदी तुमच्यासारखं. त्याला वाचन आवडत नाही तुमच्यासारखं पण गोष्टी ऐकायला आणि खेळायला खूप आवडतं.

तुम्हाला माहित्ये? आता एकमेकांशी संपर्कात राहणं खूप सोप्पं झालं आहे. तुम्ही होतात तेव्हा फक्त लँडलाईन होती ना बोलायला, पण आता तर बरीच प्रगती झाली आहे. लोकं हल्ली कायम स्क्रीनलाच चिकटलेली असतात. तुम्ही असतात ना तर नक्कीच ४ जणांना ऐकवलं असतत आणि चार पुस्तकं वाचायला लावलं असतत.

मी सध्या जर्मनी ला असते. नवऱ्याबरोबर आले आहे इकडे. इकडे माणसं कमी, स्वछता खूप. हवा छान, चालायला खूप छान मोकळी वाट. तुम्हाला नक्की आवडलं असतं इकडे. आज माझ्या नवऱ्याची आजी येत्ये जर्मनी ला. तुम्हाला आणि आजीला इकडे नाही आणता आलं. आजी माझ्याकडे बंगलोर ला आली होती, २-३ वेळेला. पणतू ला खेळवलं आहे तिने. तुम्हाला भेटली का हो ती? भेटतात का अशी माणसं मरणानंतर? 

मला कायम कुतूहल आहे ह्या गोष्टीचं. एकदा माणूस गेला कि राहतात फक्त त्याच्या आठवणी. ती व्यक्ती परत कधीच भेटत नाही, दिसत नाही. सदैव मनात आणि आठवणी मध्ये उरते. कधीतरी स्वप्नात दिसते. पण तुम्ही कधी स्वप्नात ही आला नाहीत. पण तुम्ही माझ्या कायम मनात असाल, आठवणीं मध्ये असाल. तुमच्या सारखी टापटीप आणि शिस्त जपायचा प्रयत्न करते.

तुमची नात म्हणून मला जन्म मिळाला, तुमचा काही वर्षच का होईना सहवास मिळाला ह्याबद्दल देवाला कायम धन्यवाद देते मी.

तुमच्या पुण्यतिथी ला हीच माझी आदारन्जली.

खूप खूप प्रणाम आबा!

तुमचीच दीपा 



Comments

Popular posts from this blog

नादातुनी या नाद निर्मितो

Ganesh Utsav in Karlsruhe

A divine afternoon - Annual get-together of Adhyatmavari group