31 October 2011

शिस्तप्रिय पण प्रेमळ शिक्षक

माझी शाळा विलेपार्ल्याची "पार्ले टिळक विद्यालय". माझी शाळा त्याकाळी नावाजलेली - प्रसिद्ध होती व अजूनही आहेच.

मी इंग्रजी १ ली ते इ. ७ वी (म्हणजेच आताची ५ वी ते ११ - त्याकाळी म्याट्रिक ११ वी असे) म्हणजे म्याट्रिकपर्यंत त्याच शाळेत होते. त्याकाळी शाळेत पाच सहाशे मुले असायची एकूण. एका वर्गात फार तर ३० मुले. आणी प्रत्येक वर्गाच्या दोनच तुकड्या. शाळा चालू होती त्यातच १९४२ ची 'चले जाव' चळवळ सुरु झाली. सर्व पुढारी तुरुंगात गेले. आम्ही सर्व लहानच होतो ११-१२ वर्षांची. पुष्कळदा शाळा भरायची पण सोडून द्यायचे. वातावरण गंभीरच होते. त्यातच दुस-या महायुद्धाची - लढाईची पळापळ. मुंबईवर बॉम्ब पडणार म्हणून सर्व मुंबई खाली झाली. पुरुषवर्गाने आपली कुटुंबे गावांना पाठवून दिली. मुंबई खाली झाली, पार्ले ओस पडले. आम्हीपण कोकणात मामाकडे वर्षभर राहिलो. मग हळू हळू सर्वजण मुंबईत परतू लागले. आम्हीपण पार्ल्याला येऊन आम्ही चार भावंडे शाळेत रुजू झालो. तेव्हा पार्ल्यात "जागा भाडयाने देणे आहे" अशा पाटया झळकू लागल्या. मालक पण आपल्याला जागेमधे भाडेकरू मिळावेत म्हणून २-४ रुपये भाडे कमी करू वगैरे प्रलोभने दाखवू लागले.

आमच्या वेळचे मास्तर सर्व मुलांना नावाने ओळखत असत. श्री गोडबोले मास्तर नेहमी खाडीचे कपडे वापरत. तास इतिहासाचा असे पण ते नेहमी अभ्यास आणी स्वातंत्र्यवीरांच्या गोष्टी सांगायचे. आणी स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण इंग्रजांची रविवारची सुटी काढून टाकायची व आपल्यात प्रत्येक वारला देवाचे महत्व आहे, उदा: सोम-शंकर, मंगळ/शुक्र-देवी, गुरु=दत्ता, शनी-मारुती वगैरे वगैरे. मग आपल्या आवडत्या देवाच्या वाराची आपण सुटी पाहिजे ते सांगायचे आणी मग त्या दैवाशी शाळा बंद. तासाला मजा यायची.

श्री भागवत मास्तर भूगोल शिकवायचे. Oasis कसे असते तर माझ्या डोक्याकडे बघा. मधे टक्कल व सभोवती केस. वाळवंटात, मधेच पाणी व सभोवती हिरवळ असते. अशी गमतीशीर उदाहरणे द्यायचे. व्यायामाचे शिक्षक श्री पाटणकर. ते आमच्या शेजारीच रहात. त्यांनी तासाच्या वेळी एक शिटी मारली की सर्व मुलं चिडीचूप होऊन रांगेत उभी रहात. पावसाळ्यात ते मुलांना विहिरीत पोहायला पण शिकवायचे. मी पण पोहायला शिकले. श्री सहस्रबुद्धे मास्तर, त्यांना आम्ही मामा म्हणत असू. त्यांनी पण मुला मुलींना रात्रीची सायकल शिकवली. त्यावेळी पार्ल्यातील रस्ते खाडीचे होते. ते मामा बिचारे त्या खाडीच्या रस्त्यावरून धावत व आम्हाला पॅडलिंग शिकवत. सायकलला त्याकाळी दिवा असे त्या तेलाचा वास मला अजून स्मरतो.

श्री आंबेकर चित्रकलेचे शिक्षक होते. चित्रकलेच्या १ली आणी २री परीक्षेची तयारी करून घेऊन ते मुलांना परीक्षेला बसवत असत. इंग्रजीला जोशी मास्तर. मुलांचे व्याकरण, पाठांतर छान करून करून घेत. त्यांचा दरारा असे त्यामुळे आमचे इंग्रजी नवीन विषय असून सुद्धा चांगला अभ्यास होत असे. संस्कृत पाठांतर श्री सहस्रबुद्धे (मामा) सर शिकवत. त्यांने पण संस्कृत छानच सोपे करून शिकवले. गणोबांचे (गणित!) गुरुजी आठवत नाहीत.

आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री मा. सी. पेंढारकर होते. शाळेची घनता वाजली की ते लगेच पहिल्या मजल्यावरच्या ग्यालरीत येऊन उभे राहायचे. त्यांना तिथे उभे पहिले की मुले गेट पासून धावत धावत वर्गात जायची. त्याकाळी शक्यतो उशिरा कोणी येत नसत.

जून १९४४ मधे मुंबईचा म्याट्रिकचा रिझल्ट लागला आणी अभिमानाची गोष्ट म्हणजे कुमार अशोक चितळे हा युनिव्हर्सिटीत चौथा आला. त्याच वर्षी शाळेला २५ वर्षे पूर्ण झालेली होती.
१५ ऑगस्ट १९४७ उगवला आणी भारत स्वतंत्र झाला. त्या वेळीचा आनंद विचारूच नका. मार्च ४८ ला आमचा वर्ग म्याट्रिकच्या परीक्षेला बसला. आणी ५ जून १९४८ ला रिझल्ट लागून आम्ही मुले म्याट्रिक पास झालो. सर्वत्र आनंदी आनंद. कारण - "आम्ही स्वतंत्र भारताचे पहिले म्याट्रिक" असे अभिमानाने सांगू लागलो.

मंगला करंदीकर (माहेरचे जोशी)
स्वामी समर्थ नगर, खो.न. ५९
बंडू गोखले पाट, गिरगाव,
मुंबई ४००००४
(आता वय ८१)

This is an article written by my maternal grandmother. I thank Atul profusely for typing it out for me in Marathi font!

2 comments:

  1. छान लिहिलंय. आजींचं अशा प्रकारे आपल्या काळाचं, गावाचं, शाळेचं, शिक्षकांचं आणि सुहृदांचं केलेलं सिंहावलोकन आपल्याला एकूणच जीवनाबद्दल एक वेगळीच दृष्टी देऊन जातं.

    बाकी मृणालिनी, मराठी टायपिंग तेवढं कठीण राहिलेलं नाही आता, तेव्हा एखादा प्रयत्न तुम्हीही करून बघा की इथेच....

    :-)

    ReplyDelete
  2. kiti vegle watate na tya kalche sagle vachayla.....i guess we could never co-relate the time n emotions....very well written...

    ReplyDelete

The divine intervention

The sole intention to start the spiritual group, Adhyatmwari in Germany was to give people a platform to practice their spiritual beliefs an...