सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दर बुधवारी रात्री आठ वाजता आम्ही राम रक्षा स्तोत्र म्हणण्यासाठी ऑनलाईन भेटतो. गेले दोन महिने आपल्या मुलाकडे आलेल्या शीतल काकू देखील आमच्या ह्या बुधवारच्या सत्रात सहभागी होत असत. त्यांच्या सुनेला कोणीतरी बर्लिन मध्ये भेटलं होतं आणि त्या व्यक्तींनी माझा नंबर तिला दिला होता. तिने माझ्याशी संपर्क साधून काकूंना आमच्या साप्ताहिक सत्रात जोडून घ्यायची विनंती केली. मी लगेच त्यांना जोडून घेतले. शीतल काकू अगदी उत्साही आहेत, त्यांना बरीच स्तोत्र येतात, त्या अगदी आनंदाने ती स्तोत्र आम्हाला म्हणून दाखवतात. मध्ये नवरात्रीमध्ये आम्ही बुधवारी देवीची वेगवेगळी स्तोत्र, आरत्या म्हटल्या. त्यात ही त्यांनी अगदी छान असे अष्टक म्हणून दाखवले. आता त्या दोन आठवड्यात भारतात परत जाणार आहेत. काल त्यांनी आम्हाला राम तांडव म्हणून दाखवलं. माझ्याकडे शब्द नाहीयेत त्याचे वर्णन करण्यासाठी. इतकं सुंदर म्हटलं त्यांनी ते स्तोत्र कि प्रत्येकांनी शेवटी त्यांना अगदी भरभरून दाद दिली आणि आभार देखील मानले.
शीतल काकू ह्यांनी एका ग्रुप बरोबर धनुष्कोडी ला जाऊन हे राम तांडव स्तोत्र म्हटलं आहे. त्या ग्रुप मध्ये ११११ बायका होत्या. मी सत्र संपल्यावर लगेच YouTube वर हे स्तोत्र शोधलं आणि ते मला मिळालं. संगीतबद्ध केलेलं राम तांडव स्तोत्र ऐकून तर माझ्या डोळ्यात पाणी आलं.
राम तांडव स्तोत्र हे राम कथेवर आधारित संस्कृत महाकाव्य श्री राघवेंद्रचरितममधून उद्धृत केले आहे. यामध्ये बारा श्लोकांमध्ये राम आणि रावण यांच्यातील युद्ध आणि इंद्रासारख्या देवतांनी श्री रामाची केलेली स्तुती वर्णन केली आहे.
तपश्चर्येत मग्न असताना, श्री रामचंद्रजींनी श्री भगवतानंद गुरूंना स्वप्नात कुंडलिनी शक्ती शक्तीपाताद्वारे प्रकट केली आणि नंतर भगवान शिवांनी त्यांना श्री राम कथेवर आधारित श्री राघवेंद्रचरितम् हा ग्रंथ लिहिण्यास प्रेरित केले.
या स्तोत्राची शैली आणि भावना वीर उत्कटतेने आणि युद्धाच्या ज्वराने भारलेली आहे.
शीतल काकूंसारखी अशी अनेक लोकं आहेत, जी आपापल्यापरीने आपल्या संस्कृतीसाठी, सनातन धर्मासाठी काहींना काहीतरी करत असतात. त्यांच्यामुळेच आज पर्यंत आपली संस्कृती आणि धर्म टिकून आहे असं मला वाटतं. किती तरी आक्रमणं झाली, मोडतोड झाली, धर्मांतरं करण्यात आली, पण तरीही आज ही आपण टिकून आहोत आणि राम रायाच्या कृपेने पुढची शेकडो वर्ष टिकून राहू अशी माझी खात्री आहे.
देशाबाहेर राहून हा वारसा मी पुढे चालू ठेवणार आहे. तुम्हीही तुमच्या परीने प्रयत्न करा.
तुम्ही ऐकलं आहे का हे स्तोत्र?
नक्की ऐका आणि मला तुमचे अनुभव कंमेंट्स मध्ये कळवा.
दिवाळीची अशी सुरवात ह्या आधी कधीच झाली नव्हती.
जय श्री राम
Very Well written 🙏🙏
ReplyDelete