सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दर बुधवारी रात्री आठ वाजता आम्ही राम रक्षा स्तोत्र म्हणण्यासाठी ऑनलाईन भेटतो. गेले दोन महिने आपल्या मुलाकडे आलेल्या शीतल काकू देखील आमच्या ह्या बुधवारच्या सत्रात सहभागी होत असत. त्यांच्या सुनेला कोणीतरी बर्लिन मध्ये भेटलं होतं आणि त्या व्यक्तींनी माझा नंबर तिला दिला होता. तिने माझ्याशी संपर्क साधून काकूंना आमच्या साप्ताहिक सत्रात जोडून घ्यायची विनंती केली. मी लगेच त्यांना जोडून घेतले. शीतल काकू अगदी उत्साही आहेत, त्यांना बरीच स्तोत्र येतात, त्या अगदी आनंदाने ती स्तोत्र आम्हाला म्हणून दाखवतात. मध्ये नवरात्रीमध्ये आम्ही बुधवारी देवीची वेगवेगळी स्तोत्र, आरत्या म्हटल्या. त्यात ही त्यांनी अगदी छान असे अष्टक म्हणून दाखवले. आता त्या दोन आठवड्यात भारतात परत जाणार आहेत. काल त्यांनी आम्हाला राम तांडव म्हणून दाखवलं. माझ्याकडे शब्द नाहीयेत त्याचे वर्णन करण्यासाठी. इतकं सुंदर म्हटलं त्यांनी ते स्तोत्र कि प्रत्येकांनी शेवटी त्यांना अगदी भरभरून दाद दिली आणि आभार देखील मानले.