24 November 2020

दिवाळी २०२०

२०२० हे वर्ष खूपच वेगळं आहे. सगळ्यांच्या लक्षात रहाण्याजोगं आहे. कोरोना ह्या छोट्याश्या विषाणू ने काय काय गमती घडवून आणल्या जगभरात हे काही आपल्याला आता नवीन नाही. लोकांच्या राहायच्या सवयी बदल्या, कामाच्या वेळा आणि स्वरूप बदलले, मित्र परिवार, नातेवाईक ह्यांना प्रत्यक्ष न भेटता ऑनलाईन सुद्धा भेटता येते, हे उमगले. ११ महिने हां हां म्हणता गेले सुद्धा आणि दिवाळी येऊन ठेपली. जर्मनी मध्ये काय ती दिवाळी! मागच्या वर्षी मराठी मंडळ कार्लसहृ चा मस्त "दिवाळी फराळ" हा कार्यक्रम तरी झाला होता एक दिवसाचा, पण ह्या वर्षी जानेवारी मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम सोडला तर काहीही करता आलं नाही. मग सगळ्यांनी घरच्या घरीच दिवाळी साजरी केली ह्या वर्षी.

आमची ह्या वर्षी चंगळ होती. माझ्या आई बाबानी आणि सासू सासर्यांनी भरपूर खाऊ, फराळ आम्हाला इकडे पाठवला. ते नाही येऊ शकले, पण त्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि खाऊ मात्र धनत्रयोदशी ला येऊन पोचला. मग काय माझी मज्जा! लहान मुलासारखं झालं होतें मला. एक एक बॉक्स मधून खाऊ आणि इतर सामान काढताना इतकी गम्मत वाटत होती! मी घरी लाडू आणि चिवडा केला होता, बाकी सगळं तिकडून आलं. चकली, शंकरपाळे, अनारसे, करंजी, शेव एक ना दोन! काय खाऊ आणि काय नाही असं झालं होतें मला, पण स्वतःला सावरलं जरा. दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवला आणि मग चव घेतली सगळ्याची.

मी लहान असताना डोंबिवली ला आजी सगळा फराळ घरी करायची. दिवाळीच्या १०-१५ दिवस आधी पासून घराघरातून वेगवेगळे वास येऊ लागायचे. भाजणीचे, लाडवांचे. तेव्हा वाटायचं चला आता दिवाळी लवकरच येणार! शेजारच्या नायक काकू आजी ला मदत करू लागायच्या, मी पण लुडबुड करत, गप्पा मारत फराळ करू लागायचे. कंदील, पणत्या, रांगोळी, दिव्यांच्या माळा ह्यांनी मस्त झगमगून जायचं घर आणि अक्खी बिल्डिंग आणि सगळे मजले खूपच सुंदर दिसायचे. मुलांनी मिळून वाजवले फटाके, एकत्र, भांडत, केलेला किल्ला, मग एकमेकांकडे फराळाला जायचं, देवळात बाप्पा ला फराळ देऊन यायचा, दिवाळी च्या पहिल्या दिवशी पलीकडे गणपती मंदिराला हजेरी लावून यायचं असं बरंच काही करायचो आम्ही मित्र मैत्रिणी मिळून.

मग हळूहळू सगळं बदलले, लोक दूर गेली नोकरी निम्मित, आजी ला मग होई नासे झालं आणि ती गम्मत ही राहिली नाही पहिल्यासारखी. बंगलोर ला गेल्यावर तिकडे सगळेच वेगवेगळ्या प्रांतातून आलेले. तिकडे हि एकत्र मिळून दिवाळी साजरी करायचो. आई बाबा नाहीतर सासू सासरे एकत्र असायचे तेव्हा.

जर्मनी मध्ये आमची ह्या वेळेची तिसरी दिवाळी. तीन वर्षातली हि सर्वात छान साजरी केलेली दिवाळी असं म्हणता येईल. माझ्या नवऱ्याने १० दिवस आधीच कंदील, दिव्यांच्या माळा लावून ठेवल्या होत्या बाल्कनी मध्ये. इतकी सुंदर दिसत होती ना बाल्कनी. घरात प्रत्येक खोलीत, बाल्कनी मध्ये, दारा बाहेर, देवापाशी वेगवेगळ्या रंगायच्या पणत्या लावायला खुप मज्जा यायची. अतुल ने तर फुलबाजी आणि अनार हि शोधून आणले होतें दुकानातून. आमच्या मजल्या वर राहणारी ७५ वर्षांची आजी जाम प्रेमात त्या रोषणाईच्या. तिला कल्पना होती, पण मी तिला समजावून सांगितलं. Das ist wie Weihnachten für uns. म्हणजेच तुमचा जसा क्रिसमस तशीच आमची दिवाळी. तिला मी थोडा फराळ दिला. तिने मला नऊवारी साडी आणि दागिने घातलेले बघून माझा मुकाच घ्यायचा बाकी होती, पण कोरोना मुले तिला तसं करता आलं नाही. ती नुसती माझ्याकडे पाहताच राहिली बराच वेळ आणि म्हणाली किती विविध रंग असतात तुमच्या सणांमध्ये. किती छान नटता तुम्ही! म्हंटलं हो, आमचे सगळेच सण हे विविध प्रकारचे आणि रंगतदार असतात. तिला फराळ खूप आवडला. 

तनय त्याच्या एका जर्मन आणि एका रशियन मित्राला घेऊन आला. माझ्या आजीने भरपूर इंडियन खाऊ पाठवला आहे, तर चला टेस्ट करायला! विशेषतः "Indische Chips" खायला, म्हणजे काय? तर खाकरे! त्या दोघांनी तर धाड मारली खाकऱ्यांवर आणि फराळांच्या डब्ब्यांवर. ५ वाजून गेले होतें आणि त्यांची घरी जायची वेळ झाली होती म्हणून मग मी त्यांना पिशव्यांमध्ये फराळ थोडा थोडा बांधून दिला तरी त्यांचं समाधान होईना. वेगवेगळे पदार्थ, रंग बघून आणि छान छान वास घेऊन ते भांबावून गेले होतें. शेवटी त्यांना घरी धाडलं आणि मी हुश्श केलं.

मी माझ्या काही जर्मन मैत्रिणींना (तनयच्या मित्रांच्या आई) फराळ दिला. त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांचा क्रिसमस हा सण फक्त परिवारात साजरा करतात. त्यात शेजारी पाजारी, मित्र मंडळी नसतात. एकीने विचारला सुद्धा मला तू का असा मला फराळ आणून दिलास? मी तिला समजावलं. आम्ही नेहमीच सगळे सण एकत्र साजरे करतो, एकत्र फराळ बनवतो, मिळून मिसळून सण साजरे करतो, दिवाळी ची तयारी करायला मदत करतो. सण म्हणजे इतरांना आनंद देणे, मदत करणे, आपल्याकडे केलेलं थोडंसं इतरांनाही देणे, आम्ही नेहमीच असं करतो. तिला खूपच आनंद झाला हे ऐकून आणि तिने अगदी मिटक्या मारत, चिवडा, शंकरपाळे, लाडू खाल्ले. 

मी इकडे काही वयस्क जर्मन लोकांना इंग्रजी शिकवते. सोमवारी माझा क्लास होताच. त्यात भाऊबीज आणि पाडवा सुद्धा. मग त्यांना मी दिवाळी बद्दल सांगितलं त्या दिवशी. पणत्या घेऊन गेले दाखवायला, काजू कत्तली घेऊन गेले खायला. मग काय सगळे माझ्यावर भलतेच खुश झालें. त्यांतल्या बऱ्याच जणांना हा सण माहीतच नव्हता. त्यांना दिवाळी बद्दल माहिती करून देताना मला खूप आनंद वाटत होता. हिंदू संस्कृती, भारतातले सण ह्यावर बोलताना मला खूप भरून आलं होतं.

जर्मन लोकांना भारतीय जेवण पद्धत खूप आवडते. पण आतपर्यंत त्यांना कोणी फराळ दिला होता का दिवाळी चा कोणास ठाऊक. मी सुरवात केली इकडे. भारतीय नाही तर नाही, जर्मन लोकांबरोबर साजरी करता आली ह्या वर्षी दिवाळी! 

शेवटी सण साजरा करणे हे महत्वाचे!



ही दिवाळी तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, समाधान, आरोग्य आणो!

2 comments:

  1. Excellent expression of emotions of affection.I had no idea or else I would have added a few edible items from my side. Best wishes.

    ReplyDelete
  2. दिवाळीचे सविस्तर वर्णन वाचून तुम्ही साजरी केलेली दिवाळी अगदी डोळ्यासमोर उभी राहिली. जर्मन शेजाऱ्यांना दिवाळी मध्ये सामावून घेतले याचा आनंद वाटला. इंडो जर्मन सोसायटी karlaruge हेच काम मोठ्या प्रमाणावर करते. 🙂

    ReplyDelete

The divine intervention

The sole intention to start the spiritual group, Adhyatmwari in Germany was to give people a platform to practice their spiritual beliefs an...