लहानपणी आषाढी एकादशीला उपास करायचा, मस्त साबुदाण्याची खिचडी खायची, फलाहार करायचा, इकडे तिकडे थोडी गाणी ऐकायची आणि दिवस संपून जायचा.
पण काल मात्र आयुष्यात पहिल्यांदा आषाढी एकादशी काय असते आणि कशी असते ते कळले. जर्मनी मध्ये गेले चार महिने आम्ही दर बुधवारी राम रक्षा स्तोत्र म्हणायला ऑनलाईन भेटतो. गेल्या महिन्यापासून संकष्टीला अथर्वशीर्ष म्हणायला भेटतो आहोत. त्याच ग्रुप मध्ये विचार सुरु झाला, आषाढी एकादशी येत्ये, काय करता येईल, कार्यक्रम करूया का? हा प्रश्न ग्रुप मध्ये मांडताच आपोआप रूपरेषा घडत गेली. कोणी भजन म्हणू असे म्हणाले, कोणी अनुभव सांगू असे म्हणाले, बघता बघता एक सुंदर असा कार्यक्रम तयार झाला.