गिरगाव आणि ती
आज सकाळी दुपारच्या जेवणासाठी तोंडली चिरताना तिची आठवण झाली. तारखेकडे सहज लक्ष गेले तेव्हा जाणवलं की तिला जाऊन आज बरोबर एक महिना झाला सुद्धा. तिच्यासारख्या काचऱ्या काही मला जमत नाहीत. मलाच काय कोणालाही जमत नाहीत, जमणारही नाहीत. भेंडीच्या भाजीचं ही तसच. इतकं बारीक चिरायला कसं काय जमायचं कोणास ठाऊक? आणि चव वर्षानुवर्षे तशीच. आंबेमोहोर भाताचा वास आणि गरम गरम आमटी हे माझ्या तिच्याकडच्या सुट्टीत असलेला हायपॉईंट. आणि चिवडा इतकं चविष्ट असायचा की किती ही खाल्ला तरी कमीच पडायचा मला. मे महिन्यात आंब्याच्या पेट्या घेऊन भय्ये यायचे गिरगाव च्या चाळीत. तेव्हा शेजारची शोभा बेन आणि ही तासंतास त्याच्याशी घासाघीस घालत बसायच्या आणि शेवटी एकदाचा भाव झाला की दोन पेट्या ठेऊन जायचा तो. मग काय आमची चंगळ. आमरस, पन्ह, मँगो मिल्कशेक, मँगो केक, आंबा वडी एक ना दोन असा रतिबच लागायचा. मग कधी राणीच्या बागेची सफर, कधी म्हातारीचा बूट, कधी मत्सालय, कधी चौपाटी, तिकडे भेळ पुरी, घोड्या गाडीत बसून केलेली धम्माल नेहमीच लक्षात राहील. सुट्टीत एक तरी मराठी किंवा हिंदी चित्रपट पाहायला जायचोच सगळे. गणपती मध्ये तर चाळीत नुसती धम्माल. १० दिवस विविध कार्यक्रम, स्पर्धा, खाऊ, पंगती, रांगोळ्या, प्रसाद काही विचारू नका. चाळीतले ते आयुष्य किती समृद्ध होते! खोल्या लहान होत्या, पण मनाची दारं सतत उघडी असायची. तिकडे सगळे मजेत आनंदात एकत्र राहायचे. तिकडे गेले की मी एक वेगळेच आयुष्य जगायचे.
मी भानावर आले.
कसे पळतायत नुसते दिवस. काल परवाच तिला भेटले होते असं वाटतंय. डिसेंबर २०१९ मध्ये गेले होते भारतात तेव्हाची गोष्ट ही खरी पण काल परवाच घडल्यासारखी वाटत्ये. तनय ला घेऊन तिला भेटायला गेले. ३-४ तास थांबलो, तिच्याशी गप्पा मारल्या. तिचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी उठून आधी पहिलं वर्तमानपत्रातलं शब्दकोडे सोडवूनच ती इतर काही करायची. वयाच्या नौवदीला पोचलेल्या तिला शब्द पटकन आठवायचे पण इतर गोष्टी आता हळू हळू विसरत चालली होती. तिच्या मुलीला ती तिची मोट्ठी बहीण अक्का म्हणून संबोधू लागली होती. तिची मोट्ठी बहीण कधीच सोडून गेली होती तिला, पण का कोणास ठाऊक ती तिला अक्का म्हणूनच हाक मारत तिच्याशी तसाच वागत होती. दोन बायका होत्या तिच्या सोबत कायम. त्यांच्या बरोबर ती खुश असायची. बायका ही अगदी प्रेमाने करायच्या तिचं. दान धर्म, अध्यात्म ह्यात तिला खूपच रस होता.
तिने दोन मुलांना एकटीने वाढवलं. त्या काळात सिंगल मदर ही संकल्पना नव्हतीच. पण तरीही हिम्मतीने तिने सगळं निभावलं. नोकरी केली, घर चालवलं, दोन्ही मुलांना चांगलं शिकवलं, मोठ्ठं केलं, चांगले संस्कार केले, लग्न करून दिली. त्यानंतर तिच्या भाचीबरोबर युरोप ला जायचा योग आला. तिथे ही तिने तिच्या भाचीच्या मुलीला, म्हणजे तिच्या नातीला सांभाळून, तिला गोष्टी सांगत, तिचं सगळं करत तिला लळा लावला. तिच्या भाच्यांना आणि पुतण्यांना ती खूप आवडायची. त्यांच्याकडे नेहमी रहायला जायची. त्यांनी ही काकू, मावशी आवडायची आलेली. गप्पा होयच्या, मदत होयची. तिला टापटिपीची पहिल्या पासून सवय. साड्या ही मस्त असायच्या तिच्या. छान फ्लोरल रंग असायचे. तिला पाहून प्रसन्न वाटेल कोणाला ही. आणि कायम एक स्मितहास्य. माझ्यावर तिचं खूपच जीव होता, का नसेल, मोठ्या मुलीची पहिली आणि शेवटची मुलगी होते मी. तिचं प्रोमोशन झाला होता माझ्यामुळे आजी ह्या पदावर.
तिला वाचण्याची खूप आवड होती. ती अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांशी मस्त गप्पा मारू शकायची. तिची एकच इच्छा होती. मरण सहज यावा, जास्त वेदना न होता ह्या जगाचा निरोप घ्यावा. तिने तिचं आयुष्य भरभरून जगलं होता. खूप चढ उतार पाहिले होते, पण त्यामुळे तिची सकारात्मक वृत्ती कधीही बदलली नाही. ती अबाधितच राहिली. तिने इतरांना भरपूर मदत केली, प्रेम केलं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणूनच की काय तिच्या रामाने तिला जास्ती दिवस खितपत पडू न देता २७.०४.२०२० रोजी आपल्याकडे बोलवून घेतलं.
आता गिरगाव मधलं ते आजोळ नाही, आणि ती आजी ही नाही.
उरल्या आहेत त्या फक्त तिच्या गोड़ आठवणी, तिने सांगितलेल्या गोष्टी, तिने केलेला खाऊ आणि तिने कळत नकळत दिलेले संस्कार, धडाडी, जिद्द, प्रेमळपणा, स्वछता ह्यातले धडे.
आजी, तुझ्या आठवणी कायमच माझ्या मनात राहतील, मी आजी होईपर्यंत आणि त्या नंतर ही.